झी मीडिया, उमेश जाधव
Mahashivratri 2025: 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशी शिवभक्तांकडून भगवान महादेवासाठी व्रत आणि उपवास ठेवले जातात. इतकंच नव्हे तर महादेवाच्या दर्शनासाठीदेखील रांगा लागतात. पण भिवंडीत महाशिवरात्रीच्या आधीच चमत्कार घडला आहे. भिवंडीतील पांडवगडावरील कुंडात पुरातन शिवलिंग सापडले आहेत. शिवलिंग सापडल्याचे कळताच स्थानिकांनी गडावर धाव घेतली आहे.
भिवंडी तालुक्यातील वाहुली गावालगतच्या पठारावरील जंगलात पुरातन पांडव कुंड आहे म्हणून या पठाराला पांडव गडाने देखील ओळखले जाते. काही दिवसांनी येणारी शिवरात्री निमित्ताने साफ-सफाई करण्यासाठी वाहुली गावातील तरूण योगेश गायकर हे काही तरुणांसह गेले असता कुंडाच्या साफ-सफाई दरम्यान कुंडातील पाणी व गाळ काढत असताना अचानक कुंडाच्या तळाशी पुरातन असे शिवलिंग व पादुका आढळून आल्या आहेत.
कुंडा शिवलिंग आढळून आल्याचे पाहताच तरुणांना आश्चर्याचा धक्का बसला असून खुप आनंद देखील झाला आहे. या संदर्भातची माहीती त्यांनी तात्काळ पोलिस व वनविभागाला कळविली. पोलिस व वनविभागाचे कर्मचारी पांडवगडावर दाखल झाले व त्यांनी या स्थळाची पाहणी केली. यावेळी शिवस्वरूपानंद स्वामी व माधव महाराज भोईर हे देखील गडावर पोहचले. स्वामींनी या तिर्थाला आजपासून पांडूकेश्वर नावाने ओळखले जावे असे घोषित केले. यावेळी याठिकाणी देवाचा गजर व शिवनामाचा जयघोष देखील करण्यात आला.
शिवलिंग सापडल्याची बातमी पसरताच परिसरातील भाविकांनी पांडवगडावर धाव घेतली आहे. यंदाच्या शिवरात्रीला या ठिकाणी १११ महारुद्र जलाभिषक कार्यक्रमाच आयोजन करण्यात येणार आहे. तसंच शिवलिंग सापडल्यानं यंदा भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचे मत यावेळी योगेश गायकर यांनी सांगितले आहे.
महाशिवरात्रीचा दिवस भगवान शिवाच्या भक्तांसाठी खूप महत्त्वाचा असतो. हा सण देशभरात मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जातो. दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. 2025 मध्ये, हा पवित्र सण 26 फेब्रुवारी रोजी येईल. पंचांगानुसार, चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी 2025रोजी सकाळी 11.08 वाजता सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.54 वाजता संपेल. या विशेष दिवशी भगवान शिवाची पूजा, रुद्राभिषेक आणि उपवास यांचे विशेष महत्त्व आहे.