Elon Musk Son Video : जगभरात नवनवीन प्रयोग करण्यासमवेत आपल्या अतिशय वेगळ्या व्यक्तीमत्त्वासाठी एलॉन मस्क यांनी कायमच सर्वांचं लक्ष वेधलं. संपूर्ण जगात सर्वाधिक श्रीमंती असणारी व्यक्ती म्हणूनही मस्क ओळखले जातात. अवकाश म्हणू नका किंवा मग ऑटो क्षेत्र... अगदी सर्वत्र आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावत मस्क यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे. हीच व्यक्ती आता अमेरिकेच्या सक्रिय राजकारणात दिसत असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे.
नुकतंच मस्क आणि हे ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर काही खास निमित्तानं त्यांच्याचसमवेत माध्यमांसमोर आले होते. इथं त्यांनी अमेरिकेच्या हितार्थ काही नव्या घोषणा केल्या. या सर्व गोष्टी, चर्चा सुरू असताना मस्क यांचा मुलगाही तिथंच होता. आपण, जगातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींसोबत आहोत याचं भान त्याला नव्हतं, कारण लहानसा मुलगाच तो!
अगदी सामान्यत: जशी लहान मुलं वागतात, बोलतात तसंच त्याचंही सुरू होतं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दालनात असूनही तो त्याच्याच धुंदीत कल्ला करताना दिसला. कधी त्यानं वडिलांची नक्कल केली, तर कधी उगाचच इकडेतिकडे पाहत माध्यमांचं लक्षही वेधलं. त्याच्या या बाललीला पाहून ट्रम्प यांनाही आश्चर्य वाटलं आणि कौतुकानं तेसुद्धा त्याच्याकडे पाहतच राहिले.
President Trump to Elon Musk's son, Lil X: "This is X, and he's a great guy, a high IQ individual." pic.twitter.com/Vb0I0SeZhW
— SMX (@iam_smx) February 13, 2025
काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मस्क यांनी ट्रम्प यांच्या सांगण्यावरून माध्यमांना संबोधित करण्यास सुरुवात केली. तितक्याच पुन्हा मस्क यांच्या लेकानं त्याला उचलून घेण्याचा हट्ट धरला. आता हा बालहट्ट त्यांना पुरवावाच लागला. मस्क यांनी लेकाला थेट खांद्यावर बसवलं, तर तिथंही हा चिमुकला त्याच्या दुनियेत आनंदात दिसला. एक धनाढ्य व्यक्ती आणि कामाचा मोठा व्याप असतानाची एक चांगला वडील होण्याला मस्क कायम प्राधान्य देतात हेच त्यांच्या या व्हिडीओमधून पाहायला मिळालं.