Mamta Kulkarni: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना पुन्हा एकदा किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ममता कुलकर्णीने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. 1 मिनिट 14 सेकंदाचा हा व्हिडिओ असून यात त्यांनी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे घेतला असल्याचं म्हटलं आहे.
ममता कुलकर्णी यांनी व्हिडिओत म्हटलं आहे की, माझ्या गुरु स्वामी डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठी यांच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळंच मी किन्नर आखाड्याचा महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला होता. पण मी आता माझ्या गुरुची भेट घेऊन महामंडलेश्वर झाल्यानंतर छत्र, छडी आणि चंवर भेट दिली होती. त्यातून उरलेली धनराशी मी भंडाऱ्यासाठी दिली. मी माझ्या गुरुप्रती कृतज्ञ आहे की त्यांनी पुन्हा मला पदावर घेतलं. यापुढे मी माझं संपूर्ण आयुष्य किन्नर आखाडा आणि सनातन धर्मासाठी समर्पित करेन, असं ममता कुलकर्णी उर्फ ममता नंद गिरी यांनी म्हटलं आहे.
किन्नर आखाड्याच्या पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठी यांनी म्हटलं होतं की, ममता नंद गिरी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर आहे आणि यापुढेही राहणार आहे. ममता कुलकर्णी यांनी भावूक होऊन राजीनामा दिला होता मात्र आम्ही तो स्वीकारला नव्हता, असा दावा लक्ष्मी त्रिपाठी यांनी केला आहे. त्यानंतर ममता कुलकर्णी उर्फ यमाई ममता नंद दिरी यांनीही एक व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
किन्नर आखाड्याने 24 जानेवारी रोजी ममता कुलकर्णी यांचा महामंडलेश्वर पदासाठी पट्टाभिषेक केला होता. त्यानंतर ममता कुलकर्णी यांना श्री यमाई ममता नंद गिरी असं नवं नाव मिळालं होतं. 10 फेब्रुवारी रोजी ममता कुलकर्णी यांनी व्हिडिओ जारी करत महामंडलेश्वर पद सोडण्याचा आणि किन्नर आखाड्यासोबत संबंध तोडण्याची घोषणा केली होती.