Eknath Shinde : महायुती सरकार सत्तेत येऊन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होऊन अडीच महिने उलटून गेली आहेत. तरी दर पंधरवड्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या कानावर येतच असतात. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना एकनाथ शिंदेंनी दांडी मारली. अगदी एकनाथ शिंदेंचं खात असलेल्या नगरविकास खात्याच्या बैठकींना देखील एकनाथ शिंदे गैरहजर राहिले.
महायुतीत एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरुच
बुधवारी फडणवीसांनी बोलावलेल्या नगरविकास विभागाशी संबंधित बैठकीला शिंदे गैरहजर. मलंगगडच्या कार्यक्रमाचं कारण देत शिंदेंची दांडी. पुणे, नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर शहरांच्या विकास प्राधीकरणाच्या बैठकीला दांडी. याआधी मंत्रिमंडळ बैठकीलाही एकनाथ शिंदेची अनुपस्थिति. 100 दिवसांच्या आढावा बैठकीलाही उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. आज जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला शिंदेंनी मुख्यमंत्र्यांसोबत मंचावर येणं टाळलं.
मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी विविध कारणांवरुन नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी ही बैठक बोलावली होती. मात्र त्याला शिंदे न आल्यानं पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात.मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांनी शिंदेंच्या नाराजीचे आरोप फेटाळून लावलेत.
फडणवीस मुख्यमंत्रीपदी झाले तेव्हापासूनच शिंदे आणि फडणवीस यांच्यात सारं काही अलबेला नसल्याचं सातत्यानं दिसलं. त्यात फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय शिंदेंच्या नाराजीत भर घालत राहिले.
एकनाथ शिंदे नाराज का आहेत?
भाडेतत्त्वार एसटी घेण्याच्या शिंदेंच्या काळातील निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली. मंत्र्यांचे सचिव आणि ओ.एस.डी. नेमणुकीबाबत लावलेले निकष फडणवीसांनी बदलले. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा न मिटलेला वाद. आपत्ती निवारण समितीतून सुरुवातीला उपमुख्यमंत्री शिंदेंना डावललं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील शिंदेंचे अधिकारी हटवले. त्या ठिकाणी फडणविसांकडून आपल्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक.
या आणि अशा काही निर्णयांमुळे फडणवीस आणि शिंदेंमधली दरी वाढत चाललीय. मुळातच अडीच महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आपण दुसऱ्या नाही तर अजित पवारांमुळे तिसऱ्या क्रमांकावर गेलो याची खदखद शिंदेंमध्ये प्रत्येक प्रसंगात दिसतेच. मात्र तिच खदखद अनेक कार्यक्रम बैठकांना दाडी मारुन फडणवीसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शिंदेंचा दिसतोय. मात्र महायुतीतला एक पक्ष आणि पक्षप्रमुख मागच्या अडीच महिन्यापासून नाराज आहे याचा फडणवीसांना खरंच काही फरक पडतोय का हाही संशोधनाचा विषय.