Priyanka Kadam dance Controversy: आयएएस बनण्यासाठी खोटी माहिती दिल्याच्या आरोपानंतर पूजा खेडकर वादात सापडली. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरु असताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशमध्येही पूजा खेडकरसारखे प्रकरण समोर आले आहे. समाज माध्यमात व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिव्यांग कोट्यातून भरती झालेली उमेदवार प्रियंका कदम चक्क डान्स करताना दिसतेय. हाडांशी संबंधित आजार असल्याचे सांगून प्रियंका यांनी दिव्यांग कोट्यातून अर्ज भरला होता. या प्रकारामुळे नॅशनल एज्युकेटेड यूथ यूनियनने मध्य प्रदेश सर्व्हिस लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केलाय.
एमपीपीएससी भरती 2022 मध्ये प्रियंका कदमची निवड दिव्यांग कोट्यातून झाली होती. त्या आता जिल्हा कर अधिकारी आहेत. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे त्या देशभरात चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे एमपीपीएससी ने 2022 मध्ये प्रियंका कदमची भरती करताना गोंधळ केल्याचा आरोप करण्यात आलाय.
अस्थिबाधित दिव्यांग कोटातून सरकारी नोकरी मिळवणाऱ्या प्रियंका कदम ढोलाच्या तालावर ठेका धरत आहेत. वेगवेगळ्या डान्स मूव्ह्स करताना दिसतायत. त्यांच्या डान्सचा हा एकच व्हिडीओ नाही. आणखी एका व्हिडीओमध्ये त्या डीजे फ्लोअरवर थिरकताना दिसतायत. एका व्हिडीओत तर त्या चांगल्या प्रकारे धावताना-पळताना दिसतायत. दिव्यांग कोट्यातून आलेली अधिकारी डान्स कशी करु शकते? असा प्रश्न नॅशनल एज्युकेटेड यूथ यूनियनने मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाला विचारलाय.
प्रियंका कदमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर त्यांनी आपला एक्स रे रिपोर्ट दाखवला. कंबरेजवळ दोन पायांचे हाड खराब झाले आहे. याची सर्जरी करुन पायात रॉड टाकण्यात आल्याची माहिती प्रियंका कदम यांनी आजतकला दिली. दिव्यांगचा अर्थ व्हिलचेअरवर बसणं असा होत नाही. मी पेन किलर खाऊन डान्स करते. कारण मला आवडते, असे त्या पुढे म्हणाल्या.
'कोणी काठी घेऊन चाललंय, कोणी लंगडतय किंवा व्हिलचेयरवर असेल तर त्याला समाजात दिव्यांग मानण्याची मानसिकता आहे. मजूर वडील आणि शिलाईचे काम करणाऱ्या आईची मुलगी या पदावर पोहोचू शकते तर कोणीही हे करु शकत. माझे अपंगत्व कायमस्वरुपी नाही. मी आधी तिरकं चालायची. मग काठी घेऊन चालायची. आता डॉक्टरांनी काठी घेऊनच चालायला सांगितलंय. पण मला आत्मविश्वास दाखवायचाय. म्हणून कधी कधीच काठीचा आधार घेते, असे स्पष्टीकरण प्रियंका कदम यांनी दिले आहे.
'मला लहानपणापासून नाचण्याची खूप आवड होती. कोणत्या पार्टीमध्ये जायचंय असं मला कळत तेव्हा मी पेनकिलर गोळ्या घेते. यानंतर मी 5-10 मिनिटे डान्स करु शकते. वेदना झाल्या की मी पेनकिलर घेते. मुलगी दिव्यांग असल्याने नाचू शकत नाही, असं सर्वांना वाटतं.', असेही त्या पुढे सांगतात.
देशभरात प्रियंका कदम हे एकमेव प्रकरण नाही. दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या अशा अनेक केसेस आहेत. त्यामुळे प्रियंकावर करण्यात आलेले हे आरोप खरे आहेत का? याची चौकशी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने करण्याची मागणी करण्यात आली आहे.