बॉलिवूडमध्ये 2023 वर्षात एकामागोमाग एक चित्रपट फ्लॉप होत असताना 'गदर 2' ने मात्र रिलीज होताच धुमाकूळ घातला आणि छप्परतोड कमाई केली होती. या चित्रपटामुळे सनी देओलला (Sunny Deol) पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये नव्याने एंट्री मिळाली आणि अमिषा पटेललाही (Ameesha Patel) कित्येक वर्षांनी हिट चित्रपट मिळाला. या चित्रपटामुळे एकीकडे सर्वजण यशाची चव चाखत असताना दुसरीकडे एका गोष्टीमुळे वादही निर्माण झाला होता. चित्रपटातील क्लायमॅक्सवरुन अमिषा पटेल आणि दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांच्यात वाद निर्माण झाला होता.
अमिषा पटेलने (Ameesha Patel) याआधी एका मुलाखतीत 'गदर 2' च्या क्लायमॅक्समध्ये मी व्हिलनला ठार करणार होती, पण दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी स्क्रिप्टमध्ये बदल केले असा दावा केला होता. यावर अनिल शर्मा यांनी सांगितलं होतं की, बदल केल्यानंतर अमिषा पटेलला कल्पना दिली होती आणि सर्व काही स्क्रिप्टनुसार होतं.
दरम्यान अमिषाने एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत सत्य समोर आणलं आहे. व्हिडीओत अनिल शर्मा, अमिषा पटेल आणि त्यांची टीम चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर चर्चा करताना दिसत आहेत. अमिषाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, "हे पाहिल्यानंतर अनिल शर्मा सर काय म्हणतील हे मला माहिती नाही. मी जे मुलाखतीत सांगितलं होतं त्याचा हा पुरावा आहे. अनिल सर खुलेपणाने मी विलनला मारुन टाकते असं सांगत आहेत. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नसेल, म्हणून पुन्हा शेअर करत आहे. यातून मी स्वत:ला सिद्ध करेन".
Wonder what he has to say when there is a video in circulation where @Anilsharma_dir is openly talking to me and narrating that I will kill the villain!! Since u might have missed it !! I will share it on Twitter https://t.co/gsIHUtLFuf pic.twitter.com/xwwCSYPzqs
— ameesha patel (@ameesha_patel) February 12, 2025
अनिल शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "अमिषा जेव्हा म्हणाली की मी पाकिस्तानात जाईन आणि विलनला मारेन तेव्हा आम्ही नकार दिला. तसंच हा स्क्रिप्टचा भाग नसल्याचंही सांगितलं होतं. पाकिस्तान काय पर्यटनस्थळ आहे का, सगळ्यांना सनी देओल घेऊन जाणार का? तिथे मुलगा अडकला आहे आणि येथून बायकोला पण घेऊन जायचं? कोणीतरी बायकोवर बंदूक रोखली तर तो अडकणार नाही का? तारा सिंग वेडा आहे का?".
अमिषा पटेलने चित्रपटात करण्यात आलेल्या बदलांसंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. तसंच सांगितलं होतं की, शुटिंग सुरु असताना स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात आले होते. अमिष आणि सनीला हे झालेले बदल माहिती नव्हते. रिपोर्टनुसार, अनिल शर्मा 'गदर 3' देखील बनवण्याच्या तयारीत आहेत. पण चित्रपटातील कास्ट काय असेल याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही.