काय ‘लज्जास्पद?’ कोण ‘बालिश?’ सोशल मीडियावर भिडले आदित्य ठाकरे अन् केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Aaditya thackeray and Piyush Goyal: शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यात ट्वीटर वॉर रंगलेलं पाहायला मिळालं. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 13, 2025, 09:21 PM IST
काय ‘लज्जास्पद?’ कोण ‘बालिश?’ सोशल मीडियावर भिडले आदित्य ठाकरे अन् केंद्रीय मंत्री पीयूष गोयल title=
आदित्य ठाकरे आणि पियूष गोयल

Aaditya thackeray and Piyush Goyal: उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यात ट्वीटर वॉर रंगलेलं पाहायला मिळालं.  ट्रेडमार्क आणि पेटंट कार्यालयाचे प्रशासन आणि वित्त विभाग दिल्लीत हलवण्यावरुन हा वाद सुरु झाला. आदित्य ठाकरे यांनी दुपारी 3 वाजता एक पत्र ट्विट केलं. जे पत्र पेटंट, डिझाइन आणि ट्रेड मार्कच्या कंट्रोलर यांना अरुण कुमार गुप्ता यांनी लिहिले होते. आदित्य ठाकरेंनी कोणालाही मेन्शन न करता यावर एक पोस्ट लिहिली.

मुंबईने खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्याने किती लज्जास्पद कृत्य केले आहे. ज्यांनी त्यांना निवडून दिलंय, अशा मुंबईचे ते विश्वासघात करतायत. भाजपच्या प्रत्येक कृतीत मुंबईचा अपमान होतोय. नंतर ते आमच्या जखमांवर मीठ चोळतात.आमच्या राज्यांने केंद्र सरकारला दिलेल्या योगदानासाठी केंद्राकडून आमचा योग्य वाटा मागू नये, असे  त्याच मंत्र्याला वाटते. हे मुख्यालय हलवण्याची काय गरज आहे? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.

काय म्हणाले पियूष गोयल?

आदित्य ठाकरेंचे ट्विट पाहून पियूष गोयल आक्रमक झाले. त्यांनी संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान आदित्य ठाकरेंचे ट्विट रिट्विट करत त्यांना रिप्लाय दिला.तुमची आक्रमकता बालिशपणाचे आणि अर्धवट माहितीच्या आधारे आहे. अशा अतिउत्साही आक्रमकतेमुळेच महाराष्ट्राच्या लोकांनी तुम्हाला सत्तेत येऊ देण्यास अयोग्य मानले. तुमच्या माहितीसाठी ट्रेडमार्क आणि पेटंट कार्यालयाचे मुंबई मुख्यालय शहरातून काम करत राहील. प्रशासन आणि वित्त विभागासह
@cgpdtm_india चे कार्यालय दिल्लीत असेल, असे पियूष गोयल म्हणाले. 

मोदी सरकारला भारतातील नवोन्मेषक आणि उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी या विभागाशी चांगले संरेखन आणि कार्यात्मक वाढ हवी आहे. 2014 पासून भारतातील ट्रेडमार्क आणि पेटंट इकोसिस्टम का भरभराटीला येत आहे? हे सिद्ध करणारी काही आकडेवारी येथे आहे. 2014 पासून वार्षिक पेटंट दाखल करण्याच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. मंजूर केलेल्या पेटंटच्या संख्येत 17 पट वाढ झाली आहे. ट्रेडमार्क नोंदणींमध्ये 6 पट वाढ झाली आहे आणि नोंदणीकृत डिझाइनमध्ये 4 पट पेक्षा जास्त वाढ झाल्याची माहिती पियूष गोयल यांनी दिली.प्रक्रिया जलद आणि सुरळीत करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहोत.ज्यामुळे आपण जागतिक स्तरावर स्पर्धा करतोय, असे गोयल म्हणाले. 

आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

यावर आदित्य ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.  पियुष जी, तुम्ही माझी पोस्ट पाहिली याचा मला आनंद आहे. आक्रमकतेपेक्षाही, गेल्या काही वर्षांत भाजप सरकार मुंबईतील प्रमुख मुख्यालये आणि उद्योग बाहेर हलवत आहे. याबद्दल प्रत्येक मुंबईकर आणि महाराष्ट्रातील नागरिकाची तीव्र निराशा आहे. गेलेले उद्योग परत  राज्यात आणल्यास आनंद होईल. फक्त एक प्रश्न आहे. प्रशासन आणि वित्त विभाग नसेल तर मुख्यालयाचा उपयोग काय?
जर तुम्ही मुख्यालयाच्या मूलभूत गोष्टी हलवण्याबद्दल पुनर्विचार करू शकलात तर ते खूप चांगले होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.