मोदी-ट्रम्प यांच्या पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश! आता मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील...

Big Sucess To India In First Modi Trump Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ट्रम्प यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 14, 2025, 07:10 AM IST
मोदी-ट्रम्प यांच्या पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश! आता मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील... title=
मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली

Big Sucess To India In First Modi Trump Meet: अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान भारत आणि अमेरिका संबंध अधिक सुदृढ होतील असं सांगतानाच दोन्ही नेत्यांनी आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य केलं. पत्रकार परिषदेला संयुक्तरित्या संबोधित करताना दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिकेतली संबंध अधिक घनिष्ठ होतील असा विश्वास व्यक्त केला. ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरच्या या पहिल्याच भेटीत भारताला एक मोठं यश मिळालं आहे.मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर हूसैन राणा याला भारताच्या हवाली करण्याची तयारी अमेरिकेने दाखवली आहे. खरं तर याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये या प्रत्यार्पणचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला होता. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर हूसैन राणाला भारताच्या ताब्यात देण्याचा निकाल दिल्यानंतर आता अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनीही याला मंजुरी दिली आहे.

175 जणांचा मृत्यू

मूळचा पाकिस्तानी असलेला तहव्वूर हूसैन राणा हा कॅनडामध्ये उद्योजक म्हणून काम करायचा. तहव्वूर हूसैन राणाचा 26/11 च्या हल्ल्यात सहभाग असल्याचं सिद्ध झालं आहे. 26/11 च्या हल्ल्यात 175 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामध्ये 300 जण जखमी झालेला. सदर हल्ल्यासाठी रेकी करणे आणि त्यासंदर्भातील नियोजनामध्ये सहभाग असल्याचे तहव्वूर हूसैन राणाविरुद्धचे आरोप सिद्ध झाले आहेत. आता त्याला भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे. 

ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

"मला हे सांगायला आनंद होतोय की माझ्या सरकारच्या प्रशासनाने कट रचणारा आणि जगातील सर्वात वाईट व्यक्तींपैकी एक असलेल्याच्या (तहव्वूर हूसैन राणाच्या) प्रत्यार्पणला संमती दिली आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्याचा कट रचणाऱ्याला भारतात कायदेशीर पद्धतीने शिक्षा दिली जाईल. त्याला भारतात परत पाठवलं जाणार आहे," असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

मोदींनी मानले आभार

ट्रम्प यांनी ही घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. "मुंबई हल्ल्याचा कट करणाऱ्याला भारतामध्ये खटला चालवण्यासाठी प्रत्यार्पण केलं जाणार आहे. यासाठी मान्यता दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो," असं मोदी म्हणाले.

तहव्वूर राणाचे सर्व मार्ग बंद

तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथे तुरूंगात आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेविड हेडलीशी त्याचे संबंध असल्याचा आरोप राणावर आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नाइन्थ सर्किट’ न्यायालयाने प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन केले जाऊ शकते, असे सांगितले होते. “मुंबईवर केलेला दहशतवादी हल्ला योग्यच होता”, अशी कबुलीही राणाने दिल्याचे सुनावणी दरम्यान न्यायाधीश मिलान स्मिथ यांनी सांगितले होते. त्यानंतर राणाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.राणाला ही शेवटची संधी होती. याआधी त्याने अमेरिकेच्या विविध न्यायालयांमध्ये केलेले अपील फेटाळले गेले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळून त्याचे प्रत्यार्पण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.