Chhava Review: डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, पण...; 'छावा' का पहावा?

Chhava Movie Review: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट का पहावा जाणून घ्या रिव्ह्यूमध्ये...

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 14, 2025, 01:12 PM IST
Chhava Review: डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, पण...; 'छावा' का पहावा? title=
आज प्रदर्शित झाला हा चित्रपट

Chhava Movie Review: पराभूत लोकांच्या गोष्टी कोणी सांगत नाही किंवा सांगूही नये असं वीर सावरकरांनी म्हटलं आहे. मात्र आशितोष गोवारिकर यांनी असाच एक प्रयत्न 'पानीपत'मधून केला. मात्र या चित्रपटामध्ये एकच चूक झाली ती म्हणजे चित्रपटाचा सर्वाधिक भार किंवा यश अपयश केवळ अर्जून कपूरवर अवलंबून होतं. मात्र दुसरीकडे संजय लीला भंन्सालींनी 'पद्मावत'मधून समोर ठेवलेल्या गोष्टीचं चाहत्यांची मनं जिंकली. अशीच काहीशी गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपटाबद्दलची आहे. या चित्रपटाचा शेवट डोळे पाणावणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाला हा चित्रपट नक्कीच आवडेल असं अगदी एका ओळीत सांगता येईल.

आपल्याला आव्हान नाही असं औरंगजेबला वाटत होतं पण...

चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी विकी कौशल आणि अक्षय खन्नासारख्या तगड्या कलाकरांना मुख्य भूमिका देत अर्धा डाव चित्रपटाच्या टीमने आधीच जिंकला. विकीने छत्रपती संभाजी महाराजांची तर अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. या चित्रपटची कथाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुरु होते, असं दाखवण्यात आलं आहे. दख्खनमध्ये आता मुघलांसमोर कोणाचंही आव्हान नाही असं वाटत असतानाच मुघलांचा बालेकिल्ला असलेल्या बुरहानपुरवर छत्रपती संभाजी महाराजांनी लूट केल्याची बातमी समोर येते. यासहीत औरंगजेबचा अहंकार गळून पडतो.

छत्रपती संभाजी महाराजांबरोबर दगाफटका

औरंगजेब 8 लाखांच्या फौजेसहीत दख्खनवर चाल करुन येतो. तब्बल 9 वर्ष औरंग्याला छत्रपती संभाजी महाराज चकवा देत झुंजवतात. गनिमी कावा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज औरंग्याच्या फौजेतील टोळ्यांना खात्मा करतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाई (दिव्या दत्ताने साकारलेली भूमिका) यांची भूमिका त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरतात. छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई (रश्मिका मंधाना) यांचे दोन्ही बंधू कोणाला कसलीही पूर्व कल्पना न देता छत्रपती संभाजी महाराजांवर नाराज होऊन औरंगजेबशी हातमिळवणी करतात. 

डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही

औरंगजेबविरुद्ध विद्रोह करणारा त्याचा मुलगा अकबर छत्रपती संभाजी महाराजांना शरण गेल्याची चिडही औरंगजेबच्या मनात असतानाच येसूबाईंचे दोन्ही भाऊ औरंगजेबला एक महत्त्वाची माहिती देतात. छत्रपती संभाजी महाराज केवळ 150 सैनिकांच्या तुकडीसहीत संगमेश्वरमध्ये वास्तव्यास असल्याचं औरंगजेबला कळतं. औरंगजेबच्या सैन्याची एक मोठी तुकडी संगमेश्वरवर हल्ला करुन छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश (विनीत सिंहने साकारलेली भूमिका) या दोघांना ताब्यात घेऊन औरंगजेबसमोर हजर करतात. या पुढील गोष्ट फारच भावनिक आणि छत्रपती संभाजी महाराजांचा कशाप्रकारे छळ झाला हे दर्शवणारी आहे. चित्रपटाच्या इंटरव्हलनंतरची गोष्ट पाहताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही.

या दोन गोष्टींमुळे चित्रपट होईल यशस्वी

'छावा' यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरु शकतात असं सांगितलं जात आहे. पहिली गोष्ट म्हणजे विकी कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांनी एवढ्या उत्तमरित्या पात्र साकारली आहेत की प्रेक्षक या कथेच्या प्रेमात पडतात. अशुतोष राणा, प्रदीप रावत, डायना पँटी, संतोष जुवेकर, विनीत सिंह, दिव्या दत्ता यांनी साकारलेल्या भूमिकाही दमदार आहेत. 

'छावा' यशस्वी होण्यामागील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वसामान्यांना छत्रपतींच्या घराण्याच्या कथेबद्दल असलेली आत्मियता! छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या अनेक गोष्टी देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील लोकांना ठाऊक आहेत. मात्र त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजेंच्या कार्याबद्दल त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे मोठ्या पडद्यावर पाहणं अनेकांसाठी धक्कादायक आणि रंजक असेल. खास करुन बिगरमराठी प्रेक्षकांना याबद्दल अधिक उत्सुकता असेल कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अशाप्रकारे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर हिंदीत इतक्या भव्यदिव्य स्वरुपात साकारण्यात आला आहे. 

या गोष्टी चित्रपटात नाहीच

'छावा' चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये थेट संघर्ष दाखवण्यात आला आहे. मात्र या दोन्ही प्रमुख भूमिकांचा कौटुंबिक कलह आणि इतर संघर्ष अगदीच गरजेपुरता दाखवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या कथानकात दाखवण्यात आलेली नाही. केवळ शब्द स्वरुपात छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांना ऑडिओच्या माध्यमातून ऐकू येतात. छत्रपती संभाजी महाराज सुद्धा त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच शौर्यवान, शक्तीशाली, साहसी आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम योद्धे होते हे या चित्रपटातून बिगरमराठी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यात निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला य़श आलं आहे असं म्हणता येईल. 

छत्रपती संभाजी महाराजांनी कशाप्रकारे आपल्या गनिमीकावा पद्धतीने औरंगजेबच्या सेनेला 9 वर्ष झुंजवलं हे दाखवण्यात आलं. मात्र चित्रपटामध्ये रामसेज किल्ल्यावर मुघलांनी 5 महिने वेढा घातलेला असताना त्यामधून छत्रपती संभाजी महाराजांनी कशी आपली सुटका करुन घेतली हे दाखवण्यात आलेलं नाही. तसेच रायगडला मुघलांनी घातलेल्या वेढ्यातून छत्रपती संभाजी महाराज कसे सुटले हे सुद्धा दाखवण्यात आलेलं नाही. या दोन घटना आजही दुसऱ्या छत्रपतींच्या युद्धनितीबरोबरच मुत्सद्देगिरीचं उदाहरण म्हणून आवर्जून सांगितल्या जातात. 

चित्रपटातील उणिवा

'छावा'साठी विकी कौशलने बरीच मेहनत घेतल्याचं दिसत आहे. अनेक प्रसंग अॅक्शन सीन म्हणून अगदी उत्तमरित्या साकारण्यात चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यश आलं आहे. ए. आर. रेहमानचं संगीत असून चित्रपटाचे सेट्सही आकर्षक आहेत. स्पेशल इफेक्ट्स अधिक परिणामकारकरित्या वापरता आले असते असं अनेकदा वाटतं. काही मोजके उत्तम संवाद चित्रपटामध्ये आहेत. एवढी जबरदस्त कथा हाताशी असताना संवादांवर अजून काम करणं गरजेचं होतं असं अनेकदा वाटून जातं. अभिनय आणि कथानकाच्या जोरावर हा चित्रपट यशस्वी ठरेल यात शंका नाही. या दोन्ही गोष्टींसाठी नक्कीच चित्रपट पाहता येईल. अगदीच या चित्रपटाची अवस्था 'पानीपत'सारखी होणार नाही हे निश्चित आहे.

चित्रपटाला किती स्टार्स?

दिग्दर्शक - लक्ष्मण उतेकर
संगीत - ए. आर. रेहमान
कालाकार - विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, डायना पँटी, संतोष जुवेकर, आशुतोष राणा, प्रदीप रावत, दिव्या दत्ता आणि विनीत कुमार सिंह
स्टार्स - 3.5