Maharani Yesubai Bhonsale: विकी कौशल आणि रश्मिका मंधाना यांचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा या सिनेमात मांडली आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा सिनेमा पाहण्यास उत्सुक आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे आयुष्य आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान हे सर्व सिनेमात दाखवण्यात आले आहे. या सिनेमामुळं पुन्हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्याबाबतीत जाणून घेण्यास शिवप्रेमी उत्सूक आहेत. 29 वर्षे औरंगजेबाच्या कारावासात असणाऱ्या थोर पराक्रमी महाराणीच्या समाधी कुठे आहे याचा सविस्तर आढावा घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची समाधी कुठे आहे याचा शोध घेण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू होते. अखेर 2023 साली सातारा शहरालगत असलेल्या माहुली गावात महाराणी येसूबाई यांची समाधी सापडली आहे. साताऱ्यातील एका इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेने इतिहासकालीन पत्रे व दस्तावेजानुसार महाराणी येसूबाई यांच्या समाधीची स्थाननिश्चिती केली होती.
महाराणी येसूबाई यांचे सातारा येथेच 1729 दरम्यान निधन झाले असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यानंतरच्या काळातच माहुली येथे त्यांची घुमटी म्हणजेच समाधी बांधण्यात आली, असा काही नोंदींमध्ये संदर्भ आढळतो.
हरिनारायण मठाच्या इसवी सन 1755 मधील ऐतिहासिक कागदपत्रे आणि नकाशे यावरुन महाराणी येसूबाईंच्या समाधीचा शोध लागला आहे. संगम माहुलीतील जुन्या मंदिराच्या नजीकच राजघराण्यातील वंशजांच्या समाधी आहेत. त्यामुळं यातील येसूबाईंची समाधी नेमकी कोणती हे निश्चित होत नव्हते. परंतु एका जुन्या नकाशाच्या आधारे येसूबाईंच्या समाधीच्या मूळ जागेवर शिक्कामोर्तब झाले.
संगम माहुली गावात प्रवेश केला की डाव्या बाजूला मोठा दगडी चौथरा आहे. या चौथऱ्याला लागूनच वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद दगडी बांधकाम आहे. याच दगडी बांधकामातच महाराणी येसूबाईंची समाधी आहे. राजचिन्ह, दगडी बांधकाम आणि 4 तुळशी वृंदावन असलेली ही वास्तू आहे. येसूबाईंची घुमटी असा उल्लेख काही जुन्या कागदपत्रांत सापडल्यानं, ही महाराणी येसूबाई यांचीच समाधी असल्याचं ठाम मत आहे.