Pani Puri Offer: पाणीपुरीप्रेमींची आपल्याकडे काही कमी नाहीय. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी ना कोणी तरी पाणीपुरीप्रेमी असेलच. ज्यांना डोळ्यातून पाणी येईपर्यंत आंबट-तिखट पाणीपुरी खायला आवडते. आता या पाणीपुरीप्रेमींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. जर पाणीपुरी प्रेमींना आयुष्यभर मोफत पाणीपुरीची ऑफर मिळाली तर त्यांच्यासाठी यापेक्षा चांगले काय असू शकते? अलिकडेच नागपूरमधील एका पाणीपुरी विक्रेत्याने अशीच एक ऑफर आणली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या पाणीपुरी विक्रेत्याने दिलेली ऑफर ऐकून लोक आश्चर्यचकित आणि आनंदीदेखील झाले आहेत.
विजय गुप्ता असे या नागपुरच्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. पाणीपुरीवाला विजय दररोज संध्याकाळी 6 नंतर तिथे आपला स्टॉल लावतो. पाणीपुरी विकण्याची त्याची ही तिसरी पिढी आहे. त्याच्या आजोबांनी पाणीपुरी विकायला सुरुवात केली. कॉर्पोरेट कंपन्या ज्याप्रमाणे त्यांच्या उत्पादनांवर सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करतात, त्याप्रमाणे विजय गुप्ता ग्राहकांना पाणीपुरी खाण्यासाठी काही ऑफर देण्याची कल्पना सुचली. या ऑफर अंतर्गत जर एखाद्या ग्राहकाने एकदा 99 हजार रुपये भरले तर तो आयुष्यभर अनलिमिटेड पाणीपुरी खाऊ शकतो. लाडक्या बहिणींसाठी त्याने 60 रुपयांमध्ये पाणीपुरीचे पूर्ण डिश देत आहे. आणि महाकुंभाच्या निमित्ताने 40 पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी फक्त एक रुपयाची ऑफर देखील ग्राहकांसाठी ठेवण्यात आली आहे. या अनोख्या ऑफरची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. पाणीपुरी खाणाऱ्यांपेक्षा सोशल मीडियावर याची मजा घेणाऱ्यांची संख्या सध्या वाढलेली दिसतेय. पाणीपुरी वाल्याच्या पोस्टवर यूजर्स मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
@marketing.growmatics या इंस्टाग्राम पेजवर अनलिमिटेड पाणीपुरीची ऑफर शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टला आतापर्यंत 47 हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलंय तर हजारो लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना ही ऑफर मजेदार वाटतेय तर काहींनी त्यावर प्रश्न उपस्थित केलेयत. 'ही ऑफर माझ्या आयुष्यभर राहील की दुकानदाराच्या?' असा प्रश्न एकाने विचारला. तर ही फक्त एक मार्केटिंग ट्रिक आहे आणि दुकानदाराचा खरा हेतू प्रसिद्धी मिळवणे असल्याची प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिलीय.
या ऑफरबद्दल अनेक लोक उत्साहित दिसत आहेत तर काहींनी त्याबद्दल शंका उपस्थित केली आहे. काही लोकांनी या ऑफरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पाणीपुरी विक्रेता करार कायम ठेवेल की पैसे घेतल्यानंतर तो गायब होईल? अशी शंका उपस्थित केली जात आहे. असे असले तरी या ऑफरमुळे दुकानदाराला निश्चितच प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. अशी अनोखी ऑफर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनोख्या आणि आकर्षक ऑफर्स देणे हा मार्केटिंग फंडा आहे. ही ऑफर देखील मार्केटिंग स्ट्रॅटर्जीचा एक भाग असू शकते, असे लोकांना वाटतंय. कितीही मोठा पाणीपुरीप्रेमी असला तरी तो यासाठी 99 हजार रुपये मोजायला तयार असेल का? की कांहीना पाणीपुरीप्रेमापुढे पैसे ही क्षुल्लक गोष्ट वाटतेय? हे सर्व लोकांच्या प्रतिसादावरुन कळणार आहे. त्यानंतर हा पाणीपुरी दुकानदार आपले वचन पूर्ण करतो की नाही? हे पाहायचे आहे. पण सोशल मीडियावर त्याच्या दुकानाची बरीच चर्चा झाली आहे हे निश्चित.