Queen Hirai Gond Queen: एका राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ एका भव्य वास्तुचे निर्माण केले. प्रेमाची ही खूण अजूनही चंद्रपुरात मोठ्या दिमाखात उभी आहे. चंद्रपुरात राणी हिराईने राजा बीरशहाच्या स्मरणार्थ उभी केलेली रेखीव भव्य वास्तू आहे. अठराव्या शतकातील ही समाधी आजही अतूट प्रेमाची साक्ष देत आहे उभी. आज व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा होत असताना आजच्या प्रेमवीरांना अजरामर प्रेमाचं महत्त्व समजवण्याचा प्रयत्न करत आहे.
चंद्रपुरात आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने अनोखा कार्यक्रम पार पडला. राणी हिराईने आपले पती राजे बिरशाह यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या भव्य समाधीवर चंद्रपूरकरांनी पुष्प अर्पण करत आगळ्या-वेगळ्या प्रेमाचे स्मरण केले. चंद्रपूरवर सतराव्या शतकात गोंड राजांचं राज्य होतं. राजे बीरशहा हे शासक होते. राणी हिराई आणि राजे बीरशहा यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं.
राजे बीरशहा यांच्या मृत्यूनंतर राणी हिराईनं कारभार आपल्या हाती घेतला. पण राणी हिराईच्या हृदयात वसले होते ते राजे बीरशहा. राणी हिराईनं आपल्या प्रिय पतीच्या स्मरणार्थ भव्य समाधी उभारण्याचा निर्णय घेतला. आज जिथं अंचलेश्वर शिवमंदिर आहे त्याच परिसरात राजा बीरशहाची समाधी बांधण्यात आली. जगप्रसिद्ध ताजमहालची निर्मिती ही राजानं आपल्या राणीच्या स्मरणार्थ केली. तर इथं राणीनं आपल्या पतीच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली.
शहाजहाँनं ताजमहालची निर्मिती करताना आधी त्याचा नमुना तयार करायला सांगीतला होता त्यातील मुसा या कारागीरानं तयार केलेली प्रतिकृती त्याला आवडली आणि नंतर ताजमहालची निर्मिती झाली. अशाच पद्धतीनं राणी हिराईनंसुद्धा दगडाची प्रतिकृती तयार करून घेतली होती ती आवडल्यावर या समाधीची निर्मिती झाली. आजही ही दगडाची प्रतिकृती नागपुरातल्या वास्तु संग्रहालयात ठेवलेलं आहे.
बीरशहाची समाधी ही सँड स्टोननं बांधली असून चुन्याची जुळवणी आहे. एखाद्या राजाची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी समाधी आहे. त्यामुळं या समाधीचं प्राचीन वास्तू म्हणून महत्त्व तर आहेच, शिवाय प्रेमाचं प्रतीक म्हणूनही या समाधीची विशेष ओळख आहे. स्थानिक इको प्रो संस्था यानिमित्ताने दरवर्षी या समाधीवर पुष्प अर्पण सोहळा आयोजित करते आणि नव्या पिढीला क्षणभंगुर प्रेमापेक्षा सच्च्या प्रेमाचे स्मरण करून देते