Valentines Day : फेब्रुवारी महिन्यात हवामानात कितीही आणि कसेही बदल झाले तरीही एक बदल किंबहुना एक माहोल मात्र दरवर्षी पाहायला मिळतं. प्रेमाचं हे वातावरण असतं ते म्हणजे व्हॅलेंटाईन डे चं. जवळपास एक अख्खा आठवडाभर आधीपासून या दिवसाची तयारी सुरू असते. प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि त्यानंतर व्हॅलेंटाईन डे असा हा आठवडाभर सर्वत्र प्रेमाचेच वारे वाहत असतात. सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं आणि प्रेमाचं वातावरण पाहायला मिळतं. या संपूर्ण आनंदामागे एक त्यागाची, बलिदानाही गोष्टही आहे जी विसरून चालणार नाही.
व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाण्यामागं अनेक कथा सांगितल्या जातात. संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाची कथा ही त्यातली सर्वज्ञान आणि बहुचर्चित कथा. 'ऑरिया ऑफ जैकोबस डी वॉरिजन' या पुस्तकानुसार संत व्हॅलेंटाईन हे तिसऱ्या शतकातील एक रोमन पादरी होते. त्या काळात रोमन सम्राट क्लॉडियस द्वितीय यांच्या मते सैनिकांनी देशासाठी लढावं, त्यांनी प्रेम वगैरे केलं तर त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं.
आपल्या याच विचारामुळं त्यांनी त्यांनी सैनिकांच्या लग्नावर बंदी आणली. त्याचवेळी संत व्हॅलेंटाईन यांनी प्रेम करणाऱ्यांची मदत करण्याचा निर्णय घेत कोणालाही कळू न देता सैनिकांचं लग्न लावून दिलं. रोमन सम्राटाला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी संत व्हॅलेंटाईन यांना पकडून कारागृहात पाठवलं आणि 14 फेब्रुवारी रोजी त्यांना मृत्यूदंड ठोठावला.
संत व्हॅलेंटाईन डे आणि त्यांच्या आठवणीत हा खास दिवस
सामान्यांना सम्राटाचा हा निर्णय अजिबातच पटला नाही आणि म्हणून त्यांच्या स्मरणात 14 फेब्रुवारी या दिवसाची नोंद करण्यात आली. सर्वप्रथम युरोपीय देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाऊ लागला आणि मग जगभरात या दिवसाला महत्त्वं प्राप्त झालं. मध्ययुगामध्ये 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमी युगुलांसाठी महत्त्वाचा ठरला आणि त्यानंतर दरवर्षी या दिवसाला आणखी महत्त्वं प्राप्त झालं.