Ex-CM Close Aide Viral Video: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाचे निकटवर्तीय असलेले पक्षाचे मुख्य प्रवक्ते शक्ति सिंह यादव यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. बिहारमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका हॉटेलमधील रुममध्ये शक्ति सिंह यादव सोफ्यावर बसून मद्यप्राशन करताना दिसत आहेत. शक्ती सिंह यादव यांनी केवळ बनियान आणि अंडरपँट घातल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत भाजपाने बिहारमधील दारुबंदी कायद्याचं उल्लंघन केलं जात असल्याचा टोला लगावला आहे.
कायमच दारुबंदीच्या धोरणांवरुन नीतीश कुमार सरकारला व्हिडीओत दिसणारी शक्ति सिंह यादव लक्ष्य करताना दिसतात. आता त्यांचाच हा व्हिडीओ शेअर करताना भाजपाने आधी तेजस्वी यादव यांनी दारु व्यापाऱ्यांकडून निधीन घेतला आणि आता राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख प्रवक्ते दारुच्या नशेत धुंद असल्याचं दिसत आहे. भाजपाने शेअर केलेला हा व्हिडीओ 33 सेकंदांचा आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये शक्ति सिंह यादव एका हॉटेलमधील रुममध्ये चड्डी-बनियान घालून सोफ्यावर बसल्याचं दिसत आहे. शक्ति सिंह यादव यांच्या समोरच्या टेबलवर अनेक ग्लास ठेवण्यात आलेत. या ग्लासांमध्ये मद्य दिसत आहे. शक्ति सिंह यादव हे फोनवर कोणाशी तरी बोलतानाही दिसत आहेत. तसेच मध्ये मध्ये शक्ति सिंह यादव काहीतरी खातानाही दिसत आहेत. हा व्हिडीओ याच हॉटेल रुममध्ये बसलेल्या एका व्यक्तीने शूट केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
देखिए, शराबबंदी कानून की धज्जियाँ उड़ाते राजद के मुख्य प्रवक्ता!#ShameOnRJD pic.twitter.com/3f5r6XIU4u
— BJP Bihar (@BJP4Bihar) February 12, 2025
व्हिडीओत शक्ति सिंह यादवांबरोबर तीन ते चार जण दिसत आहेत. हा व्हिडीओ भाजपाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आल्यानंतर भाजपा नेत्यांनी शक्ति सिंह यादव यांना लक्ष्य केलं आहे. भाजपाचे प्रवक्ते कुंतल कृष्णा यांनी या व्हिडीओवरुन राजद आणि तेजस्वी यांना सदर प्रकरणाबद्दल सवाल विचारला आहे.
अनेकांनी सध्या सत्तेत असलेल्या भाजपाने या प्रकरणात शक्ति सिंह यादवांविरोधात कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. काहींनी सामान्यपणे इतरांना कोंडीत पकडणाऱ्या प्रवक्त्यांपैकी एकजण आज स्वत: अडकल्याचं म्हटलं आहे.