'एखादी बँक वाईट...', 'न्यू इंडिया' बँकेवरील RBI च्या कारवाईवर फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis On New India Co operative Bank Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बँकेवरील कारवाईबद्दल पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 14, 2025, 03:15 PM IST
'एखादी बँक वाईट...', 'न्यू इंडिया' बँकेवरील RBI च्या कारवाईवर फडणवीस स्पष्टच बोलले title=
दिल्लीत बोलताना नोंदवलं मत

Devendra Fadnavis On New India Co operative Bank Issue: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादल्याची बातमी समोर आल्यानंतर आज सकाळपासूनच या बँकांच्या वेगवेगळ्या शाखांबाहेर ग्राहकांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या बँकेच्या बहुतांश शाखा मुंबई आणि उपनगरांमध्ये आहेत. मुंबईसहीत पुणे, ठाणे आणि गुजरातमधील सुरतमध्ये न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखा असून सर्वच शाखांबाहेर आज गर्दी झाल्याचं चित्र दिसून आलं. एकीकडे ग्राहकांमध्ये या निर्बंधांनंतर गोंधळाचं वातावरण असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरबीआयच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. 

फडणवीसांना नेमका काय प्रश्न विचारण्यात आला?

नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने आयोजित केलेल्या गृहमंत्र्यांच्या बैठकीसाठी उपस्थित राहिल्यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला यावेळेस एका पत्रकाराने त्यांना, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध आणले आहेत. आज सकाळपासूनच ग्राहकांच्या या बँकेच्या शाखांबाहेर रांगा दिसत आहेत. यावर तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न विचारला. यावर फडणवीसांनी आरबीआयच्या कारवाईचं समर्थन केलं. 

फडणवीस काय म्हणाले?

पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी,"एखादी बँक वाईट कामगिरी करते, त्या बँकेचे अॅसेट्स कमी होतात तेव्हा आरबीआय अशाप्रकारची कारवाई करते," असं सांगितलं. "अशा बँकांवर निर्बंध घातले जातात. कमी होणाऱ्या अॅसेट्स थांबवण्याचा प्रयत्न करतात. आरबीआय अशा प्रकरणात चौकशी करते. याची पूर्ण माहिती माझ्याकडे नाही. मात्र जी प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार मी म्हणू इच्छितो की, नक्कीच जी कारवाई केली आहे ती विचारपूर्वकच केली असेल," असं फडणवीस म्हणाले. 

नेमकी काय कारवाई केलीय बँकेने?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली आहे. नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवींवर आरबीआयकडून बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे  नवीन गुंतवणूक, नवीन देयके, नवीन ठेवी घेण्यावरही बंदी घालण्यात आली असून बँकेची स्थिती सुधरेपर्यंत आरबीआयचे निर्बंध कायम असणार आहेत. आरबीआने काल सांयकाळी पत्रक जारी केल्यानंतर आज सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी बँकांच्या शाखेबाहेर दिसत आहे. अनेक ग्राहकांनी आम्हाला किमान पैसे काढण्यासाठी एखादा दिवस तरी द्यायचा अशी मागणी केली आहे.

सर्व्हर बंद आणि ग्राहकांचा गोंधळ

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे अनेक ग्राहक शुक्रवारपासूनच शाखांबाहेर गर्दी करुन उभे आहेत. काहींनी आमचे लाखो रुपये बँकेत अडकल्याचं सांगितलं आहे. बँकेकडून पासबूकमध्ये एन्ट्रीही करुन दिली जात नसल्याचं ग्राहकांनी म्हटलं आहे. एका ग्राहकाने आतमध्ये पेनने बॅलेन्स लिहून दिलं जात असल्याची तक्रार करतानाच पहिल्या पानावर लिहिलेलं 5 लाखांचं बॅलेन्स दाखवलं. बँकेचे सर्व्हर बंद आहेत. लेखी एन्ट्री करुन दिली जात आहे, असं ग्राहकांनी म्हटलं आहे. आरबीआयने दोन दिवस आधी सांगितलं असतं तर किमान पैसे तरी काढून घेतले आहेत, असं अनेक ग्राहकांनी म्हटलं आहे.

बँकेच्या शाखा किती आणि किती ग्राहक?

या बँकेला 1990 साली शेड्यूल बँकचा दर्जा मिळाला होता. 1999 मध्ये ही बँक मल्टी स्टेट बँक झाल्यानंतर त्यांनी मुंबईबरोबरच पुणे आणि ठाण्यासहीत राज्याबाहेर सुरतमध्येही शाखा सुरु केली. बँकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, 31 मार्च 2020 च्या आकडेवारीमध्ये बँकेचे एकूण 7 हजार 145 नियमित ग्राहक आहेत. या बँकेमध्ये चार वर्षांपूर्वी 2972 कोटी रुपयांहून अधिकच्या ठेवी होत्या.