मुंबई : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र धनंजय मुंडे यांना अभय दिल्याचं पाहायला मिळतंय. दोषी नाही तर कारवाई होणार नसल्याची ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली आहे.
चहुबाजुंनी आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने अभय दिल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीनं ठाम भूमिका घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई करणार नसल्याची भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरूवारी धनंजय मुंडे अचान अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर त्याची भेट घेण्यासाठी पोहोचले. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात तब्बल 2 तास चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेतेही देवगिरीवर उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय. पुरावे असताना कारवाई का नाही. कोर्टानं सांगितल्यावरच कारवाई होणार का असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारलाय.
- पवनचक्की खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणे
- निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अटकेनंतर मुंडेंवर आरोप
- जिल्हा नियोजन समितीच्या निधीत घोटाळा
- कृषिमंत्रिपदाच्या काळात कृषी साहित्य खरेदीत घोटाळा
आरोपींच्या फेऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मुंडेंवर होणाऱ्या सततच्या गंभीर आरोपांमुळे राष्ट्रवादीवरही मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढत चालला होता. मात्र आता एवढे आरोप होऊनही राष्ट्रवादीनं धनंजय मुंडे यांना अभय दिलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणांमधला तपास निष्पक्षपाती होणार का असा सवालही उपस्थित केला जातोय.