शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात खासदारांना स्नेहभोजन देण्यावरुन वाद सुरु झाले आहेत. त्यात आता आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिलेल्या सूचना शिवसेना ठाकरे गटाच्याच नेत्यांना पटल्या नसल्याचं दिसत आहे. त्यामुळं स्नेहभोजनावरुन सुरु झालेल्या वादाला नवं वळण मिळालं आहे.
दिल्लीत शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी ठाकरे गटाच्या खासदारांना स्नेहभोजनाला बोलावलं आहे. त्यावरुन सुरु झालेला वाद अजून शमला नाही. त्यात शिवसेना ठाकरे गटातच मतमतांतरं असल्याचं आता समोर आलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि प्रतापराव जाधवांनी दिलेल्या मेजवानीला शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतले खासदार संजय दिना पाटील, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे गेले होते. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनाला जाण्याआधी परवानगी घ्यावी अशा सूचना केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यावरुन आता शिवसेना ठाकरे गटातच मतमतांतरं असल्याचं समोर आलं आहे. कारण अंबादास दानवेंनी आदित्य ठाकरेंच्या सूचनेला आक्षेप घेत, व्यक्तिगत संबंध असतील तर स्नेहभोजनाला जायला हरकत नाही असं मत मांडलंय.
दुसरीकडे उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सांमतांनी टोला लगावला आहे. 'भविष्यात नाष्ट्याला काय खायचं याचेही आदेश येतील' असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या सुचनांची खिल्ली उडवली.
आधीच ठाकरे घराणं आपल्या पक्षातल्या नेत्यांना घरगड्यांप्रमाणं वागवतं असा आरोप पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी केला आहे. त्यात आता खासदार असलेल्या बड्या नेत्यांनाही जर स्नेहभोजनासाठी पक्षाची किंवा पक्षश्रेष्ठींची परवानगी खरंच घ्यावी लागणार असेल तर शिवसेना ठाकरे गटात नाराजीच्या करपट ढेकरा वाढत जाणार असंच दिसत आहे.