KDMC illegal Building: कल्याण डोंबिवलीतील रहिवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही राहत असलेल्या इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर तर नाहीना? याची चौकशी नक्की करा. अन्यथा कोणत्याही क्षणी तुमच्यावर बेघर होण्याची वेळ येऊ शकते. कारण अशा बेकायदेशीर इमारतींवर हातोडा चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरच या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 इमारतींवर न्यायालयाच्या आदेशानंतर हातोडा चालवला जाणार आहे.बेकायदेशीर बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत असं स्पष्ट करत हायकोर्टानं कल्याण-डोंबिवली महापालिकेला थेट कारवाईचे आदेश दिलेत.
हायकोर्टाच्या या निर्देशांमुळे केडीएमसीतील 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील सुमारे 30 इमारतींनी नियमनासाठी महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र हे अर्ज महापालिकेनं फेटाळून लावले आहेत. या अर्जांवर निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई करु नये, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.
मात्र न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खंडपीठानं याबाबत आदेश जारी करत याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. दरम्यान या सगळ्यांमध्ये रहिवाशांना दोषी ठरवण्यात आलं .त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं. मराठी माणसाला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अन्यथा आम्हाला गावी जावे लागेल असे इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे.