War Room Cold War: महायुती सरकारमध्ये वॉररुमवरुन कोल्ड वॉर सुरु झालीये की काय अशी स्थिती आहे. राज्यातील प्रकल्पांचा विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस आणि अजितदादांनी वॉर रुम सुरु केल्यात. दोघांनी वॉर रुम सुरु केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही वॉर रुमही सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. या वॉर रुमच्या माध्यमातून शिंदेंही प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. प्रकल्पांना गती मिळावी विकासकामं लवकरात लवकर व्हावीत असा या वॉर रुमचा उद्देश असल्याचं सांगण्यात येतंय.
महायुती सरकारमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचा देखावा केला जात असला तरी महायुतीत सर्वकाही अलबेल आहे असं नाही. महायुतीत वेगवेगळ्या मुद्यांवर आता कुरबुरी समोर येऊ लागल्यात. विकास कामांच्या आढाव्यासाठी घेतलेल्या वॉर रुमवरुन महायुतीत कोल्डवॉर सुरु झालीये. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वॉर रुम सुरु केली होती. त्यानंतर अजित पवारांनी वॉर रुम सुरु केली. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही वॉर रुम सुरु केलीय. तीन नेत्यांमध्ये सुप्त स्पर्धा तर सुरु झाली नाही ना अशी चर्चा या निमित्तानं सुरु झालीये.
संजय राऊतांनी वॉर रुमवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीये.वॉररुमच्या मुद्यावर कोणीही राजकारण करु नये असं सांगत मुख्यमंत्र्यांनी या मुद्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.
महायुतीत सुरुवातीला छोट्याशा कुरबुरी होत्या. आता त्या कुरबुरींचं प्रमाण वाढलंय. महायुतीतलं शीतयुद्धाचं रणसंग्रामात रुपांतर होणार नाही याची काळजी महायुतीच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण समितीतून एकनाथ शिंदेंना वगळल्यानं वाद निर्माण झाला होता. महायुतीतल्या नाराजीच्या आपत्तीवर आता उपाय शोधण्यात आला आहे. शिवसेनेच्या नाराजीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा समितीवर घेण्यात आलं आहे. त्यासाठी सरकारकडून नियमात बदल करण्यात आला आहे. आता आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री तर उपाध्यक्ष दोन्ही उपमुख्यमंत्री असतील. 2019 च्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री काही ठराविक मंत्री असतील असा नियम होता. आता यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती जलसंधारणमंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यावरून रुसून जातील त्यामुळे त्यांना नियम बदलून त्यांनी पुन्हा समितीत घेण्यात आलं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये बदल का केला याची जोरदार चर्चा सुरू आहे.