Maharashtra Weather News : शीतलहरींच्या वाटेत अडथळा निर्माण होत असल्यामुळं राज्यात तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमानाचा आकडा पस्तिशीपार गेल्यानं आतापासूनच सुरू झालेली ही होरपळ पाहता आता अनेकांनाच मे महिन्याची चिंता सतावू लागली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ क्षेत्रामध्ये उकाडा सुरू झाला असून, इथंही तापमान 35 ते 37 अंशांदरम्यान आहे. राज्यात सध्या सर्वोच्च तामपानाची नोंद सोलापूर आणि रत्नागिरी इथं करण्यात आली असून, इथं हा आकडा अनुक्रमे 36.6 आणि 37 अंश इतका असल्याचं लक्षात येत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड इथं तापमानाचा निच्चांकी आकडा दोन ते तीन अंशांनी वाढला असून, तो 9.5 अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळं इथंही थंडीनं काढता पाय घेतल्याची चिन्हं आहेत. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यस्थानमधील पूर्वेकडील क्षेत्रांवर पुन्हा एकदा शीतलहरींचा परिणाम दिसून येणार आहे. तर, अतीव उत्तरेकडे असणाऱ्या राज्याच्या पर्वतीय भागांमध्ये थंड वारे आणखी तीव्र होणार असून हीमवृष्टीत वाढ होणार आहे. मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र तापमानवाढ पाहायला मिळेल.
एकंदरच राज्यातील कमाल तापमानात वाढ होत असून, ही वाढ अशी सातत्यानं कायम राहिल असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं दिला आहे. सद्यस्थितीला कमाल आणि किमान तापमानात 17 ते 21 अंशांची तफावत दिसत असून, आकडेवारीतील हा फरक दीर्घकाळासाठी कायम राहण्याच अंदाज आहे.
मुंबईकरांना उन्हाळ्याच्या झळा
राज्यात ही स्थिती असतानाच मुंबईतही शिमग्याआधीच उन्हाच्या झळांनी ताप वाढवला आहे. रात्र थंड आणि दिवसा उष्ण, अशा हवामानाने मुंबईकर बेजार झाले आहेत. याच धर्तीवर शनिवारी, रविवारी मुंबईशहर आणि उपनगरांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहील, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.