Shanidev Abhishek In Shani Shingnapur: महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. अहिल्यानगरपासून ३० किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे हजारो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात. शनि देवाचा कोप होऊ नये म्हणून येथील शिळेवर तेल वाहण्याची प्रथा आहे. दररोज लाखो भाविक येथे तेल अर्पण करतात. मात्र, अलीकडेच संस्थानाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शनि शिंगणापूर येथील शनी देवाला तेल वाहताना आता फक्त शुद्ध तेलाचाच अभिषेक करावा, असं अवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे. शुद्ध आणि ब्रँडेड तेलच फक्त शनी देवाला वाहण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आला आहे. साधे तेल केमिकलयुक्त असल्यामुळं शनि देवाच्या शिळेवर त्याचा परिणाम होत असल्याचे समोर येत आहे.
शनि शिंगणापूर येथील मंदिरात शनी चौथऱ्यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे. त्यामुळं केमिकलयुक्त तेलामुळं शिळेची झीज होऊ शकते. शनि देवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून शुद्ध आणि ब्रँडेड तेल वाहण्याचा निर्णय विश्वस्त मंडळांनी घेतला आहे.
शनिदेवाला तेल अर्पण केल्याने कुंडलीतील शनि बलवान होतो. त्या व्यक्तीला शनिदेवाची कृपा प्राप्त होते, अशी मान्यता आहे. शनिदेव न्याय देवता म्हणून ओळखले जातात. त्यामुळं तेल अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे दुःख दूर होतात, अशीही मान्यता आहे.
त्रेतायुगात बजरंगबली हनुमानाने शनिदेवाच्या शरीरावर तेल लावले होते. त्यामुळं त्यांच्या वेदना दूर झाल्या होत्या. तेव्हा शनिदेवाने म्हटलं होतं की, जो भक्त माझ्यावर विधीपूर्वक मोहरीचे तेल अर्पण करेल. त्याला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली.