New Film City Of Maharashtra In Nagpur District : भारतातील सर्वात मोठी चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी आपल्या महाराष्ट्रात आहे. मुंबईतील गोरेगाव येथे असलेली फिल्मसिटी दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून ओळखली जाते. तर, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची फिल्मसिटी हैद्राबाद येथे आहे. या फिल्मसिटीचे नाव रामोजी फिल्मसिटी असे आहे. यानंतर आता महाराष्ट्रात भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फिल्मसिटी उभारली जाणार आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात फिल्मसिटी उभारली जाणार आहे. मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबई प्रमाणाचे आता विदर्भात चित्रपट निर्मितीला चालना मिळणार आहे. रामटेकजवळ फिल्म सिटी उभारली जाणार आहे. यासाठी रामटेक जवळील 128 एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित करण्यात आली आहे. ही जागा 15 दिवसात हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल..
रामटेक तालुक्यातील नवरगाव येथे ही फिल्मसिटी उभारली जाणार आहे. फिल्मसिटी यशस्वी व्हावी यासाठी एक कन्सल्टंट नेमला जाणार आहे. मुंबई फिल्मसिटी आणि रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विदर्भातील ही फिल्मसिटी उभारली जाणार आहे. विदर्भातील किंबहुना मध्य भारतातील पहिली तर महाराष्ट्रातील दुसरी चित्रनगरी असेल.
रामटेक हा परिसर वनसंपदा आणि तलावांसह निसर्गाने नटलेला परिसर आहे. रामटेकचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. प्रभू श्रीरामाचे वनवासातील वास्तव्य येथे होते अशीही अख्यायिका आहे. रामटेकगड राम मंदिर, तोतलाडोह आणि पेंच धरण, नगरधनचा किल्ला, पेंच जंगल ही येथील पर्यटन स्थळ आहेत. मुंबईला जाण्याऐवजी मध्य भारतातील कलावंतांच्या दृष्टीने हे ठिकाण सोयीस्कर ठरू शकते. एडवेंचर स्पोर्टच्या दृष्टीने पूरक आणि सुविधा उपलब्ध असलेला असा हा परिसर आहे यामुळे महाराष्ट्रात नवी फिल्मसिटी निर्माण करण्यासाठी रामटेक परिसराची निवड करण्यात आल्याचे समजते. चिखलदरा इथं बऱ्याच चित्रपटांचं शुटिंग होत असतं. त्यामुळे विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा इथं फिल्मसिटी स्थापन करण्याची मागणी अनेक लोकप्रितिनीधींनी केली होती.