शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटींची नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या

Agniveer Akshay Gawate: महाराष्ट्राचे सुपुत्र अक्षय गवते यांना लडाखच्या सियाचिनमध्ये वीरमरण आलं. अग्निवीर असलेल्या अक्षय गवते लाईन ऑफ ड्युटीवर तैनात होते.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 23, 2023, 05:19 PM IST
शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटींची नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या title=
Agniveer Akshay Gawate Dies In Siachen Family To Get more then ₹ 1 Crore

Agniveer Akshay Gawate: मागील वर्षी लागू केलेल्या अग्नीविर योजनेत भारतीय सैन्यात भरती झालेल्या वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. अक्षय गवते हे मूळचे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावचे रहिवासी होते. २० ऑक्टोंबरच्या रात्री रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अक्षय गवते यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. शहीद जवान अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना किती नुकसानभरपाई मिळणार याबाबत चर्चा होत असता आता भारतीय लष्कराने एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. गवते यांच्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती आकडेवारीसह एक्सवर पोस्ट केली. 

'अग्नवीर (ऑपरेटर) गवते अक्षय लक्ष्मण यांनी सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली. या दु:खद प्रसंगात भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अक्षय गवते यांच्या निकटवर्तीयांना आर्थिक मदत करण्याबाबत सोशल मीडियावरील परस्परविरोधी संदेश पाहता, हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की नातेवाईकांना मिळणारे मानधन सैनिकाच्या संबंधित अटी व शर्तींद्वारे नियंत्रित केले जाते. अग्निवीरांच्या नियुक्तीच्या अटींनुसार, हुतात्मासाठी अधिकृत मानधन असेल, असं भारतीय लष्कराने पोस्ट करत म्हटले आहे. 

शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबाला किती मानधन मिळणार?

- शहीद अक्षय यांच्या कुटुंबियांनी विम्याच्या रुपात ४८ लाख मिळतील.
- कुटुंबाला अग्निवीरानं योगदान केलेल्या सेवा निधीतील (३० टक्के) रक्कम मिळेल. त्यात सरकार तितक्याच रकमेची भर घालेल. त्यावर व्याजही देईल.
- अक्षय गवतेंच्या सेवेचा ४ वर्षांपैकी जितका कार्यकाळ शिल्लक आहे, तिथपर्यंत त्यांच्या कुटुंबाला पैसे मिळतील. ही रक्कम १३ लाखांपेक्षा अधिक असेल.
- सशस्त्र दल युद्ध कोषातून कुटुंबाला ८ लाख रुपये मिळतील.
- लष्कर पत्नी कल्याण संस्थेतून तात्काळ ३० हजार रुपये मिळतील.
- शहीद अक्षय गवतेंच्या कुटुंबाला एकूण १ कोटी १३ लाखांची मदत मिळेल.

३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय "अग्निवीर"म्हणून सैन्यात भरती झाले होते. शहिद जवान अक्षय यांच्यावर सोमवारी २३ ऑक्टोंबर ला सकाळी त्यांच्या जन्मगावी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अक्षय यांना एक लहान बहिण असून त्यांचे आई- वडील शेती करतात. अक्षय यांची मृत्यूची वार्ता कळताच पिंपळगाव सराई गावावर एकच शोककळा पसरली आहे.