Ajit Pawar Joined Shinde government Raj Thackeray Called For Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज आमदारांनी रविवारी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. या घडामोडींवर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'चिखल' असं म्हणत एक पोस्ट शेअर केली. राज ठाकरेंनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही तासांमध्ये मध्यरात्रीनंतर शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आता तरी एकत्र यावं असं आवाहन करणारे बॅनर्स झळकले आहेत. दुसरीकडे आज केंद्र सरकारची महत्त्वाची बैठक आज दिल्लीमध्ये पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील या बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळातील फेरबदलांवर चर्चा केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रात बैठकीची तयारी सुरु असतानाच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. राज ठाकरे या बैठकीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्याबरोबर एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला मनसे सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळी 10 वाजता दादर येथील राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहेत. अजित पवारांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विचारमंथन होणार असल्याचे समजते. सध्या राज्याच्या विधीमंडळामध्ये राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. राज ठाकरेंनी या घडामोडींवर सोशल मीडियावरुन केलेल्या विधानांवरुन ते अजित पवारांनी शिंदे गटात जाण्याच्या निर्णयावरुन नाराज दिसत आहेत.
"आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! तसंही महाराष्ट्र भाजपाला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?" अशी पोस्ट राज यांनी सोशल मीडियावरुन केली आहे.
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023
अजित पवार यांच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेलही उपस्थित असल्याने त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींनंतर केंद्रीय मंत्रिमंडळातही मोठ्या फेरबदलांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. दिल्लीच्या प्रगती मैदान कन्व्हेंशन सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची शक्यता वर्तवली जात आहे. प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांची थेट केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.