जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचा जलसाठा पूर्णपणे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करण्यात आला. यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी त्यांची जमीन, प्रकल्पातून पाणी त्यांच्या शेतीला मिळेल या आशेने दिली होती.
नुकतंच २४ TMC पाणी अकोला शहराला देण्यात येणार असल्याचा आदेश काढण्यात आला होता. या आदेशाच्या विरोधात याआधी देखील शेतकऱ्यांनी अकोट तेल्हाऱ्याचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांना भूमिपूजन कार्यक्रम दरम्यान खडेबोल सुनावले होते. तसेच सर्वपक्षीय बंदही पुकारण्यात आला होता. त्यानंतर शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात दखल घेत या आदेशाला स्थगिती दिली होती.
आदेशाला स्थगिती नव्हे तर, आदेश रद्दचे लेखी आश्वासन हवे या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढला. तेल्हारा शहराच्या इतिहासात ४० वर्षानंतर पहिल्यांदाच भव्य मोर्चा निघाला.
अकोट - तेल्हाराचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना गावबंदीचे फलकही ठीक ठिकाणी लावण्यात आले होते. १९ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयावर उपोषण व गावोगावात विविध आंदोलन करण्याचा निर्णय या मोर्चावेळी घेण्यात आला आहे.