India vs England 2nd T20I Win Insta Reel Connection: आतापर्यंत तुम्ही क्रिकेटचा सामना जिंकून देण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली या प्रश्नाचं उत्तर ऐकताना प्रशिक्षक, मैदानातील सहकारी, पत्नी, आई, वडील किंवा चाहते वगैरे असं उत्तर ऐकलं असेल. मात्र शनिवारी चेन्नईमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर आपल्या चमकदार कामगिरीचं श्रेय एका भारतीय खेळाडूने चक्क आपल्या इन्स्टाग्रामवरील रिलला दिलं आहे. अत्यंत अटीतटीचा हा सामना भारताने अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकला. या विजयाचा शिल्पकार ठरला 55 बॉलमध्ये 72 धावा करणारा तिलक वर्मा! मात्र भाव खाऊन गेला ऐनवेळी तिकल वर्मावरील तणाव कमी करणारा चौकार लगावणारा एक तळाच भारतीय फलंदाज. हा कोण आणि त्याने नेमकं काय म्हटलंय पाहूयात...
भारतीय संघ टी-20 मालिकेमध्ये 1-0 ने आघाडीवर असल्याने चेन्नईतील टी-20 सामना जिंकण्याच्या इराद्यानेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा पाहुणा संघ शनिवारी मैदानात उतरलेला. मात्र तिलक वर्माच्या जिद्द आणि चिकाटीसमोर इंग्लंडचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये तिलक वर्माने भारतासाठी विजश्री खेचून आणला. हा विजय एवढा खास होता की सामना जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदानात आल्या आल्या वाकून तिलक वर्माला सलाम केला. मात्र तिलक जरी या विजयाचा मानकरी असला तरी मौक्याच्या क्षणी भारताला आवश्यक असणारा चौकार लगावत भारताच्या फिरकीपटूने सर्वांचीच मनं जिंकली. या निर्णायक चौकारामुळे भारताला लक्ष्य गाठणं सहज शक्य झालं.
सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या तिलक वर्माने 55 बॉलमध्ये 72 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने 130.91 च्या सरासरीने धावा केल्या. आपल्या खेळीत अभिषेकने 4 चौकार आणि 5 षटकार लगावले. मात्र दुसऱ्या बाजूला सातत्याने विकेट पडत होत्या. आता तिलक नाबाद राहून इतर सर्व बाद होतात की काय असं वाटत असतानाच नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने रवि बिश्नोईने फलंदाजीमध्येही कमाल दाखवली. काही चेंडू खेळून काढणाऱ्या रविने योग्य वेळी स्ट्राइक रोटेट करण्यात यश मिळवलं. विशेष म्हणजे 8 बॉलमध्ये 10 रन आणि हातात दोन विकेट्स असताना तिलकने रवि बिश्रोईवर विश्वास दाखवत त्याला 19 व्या ओव्हरचे शेवटचे दोन बॉल खेळायला दिले. एकीकडे जोश बटलर तिलक वर्माला केंद्रस्थानी ठेऊन फिल्डींग सेट करत असतानाच दुसरीकडे रवि बिश्नोईने 'कानामागून आली अन् तिखट झाली' म्हणावं अशाप्रकारे लियाम लिविंगस्टनच्या शेवटून दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. यामुळे समिकरण 7 बॉल 6 धावा असं झालं. या चौकारामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये तिलक फलंदाजीला आला तेव्हा 6 धावांची आवश्यकता उरली होती. तिलकने शेवटच्या ओव्हरला दोन धावा पळून काढल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत सामना जिंकून दिला.
5 बॉलमध्ये 2 चौकारांच्या मदतीने 9 धावा करणाऱ्या बिश्नोईने मौक्याच्या क्षणी लगावल्या चौकाराबद्दल त्याला सामन्यानंतरच्या मुलाखतीत विचारलं असता त्याने आपल्या इन्स्टाग्राम रिलचा उल्लेख केला. तुला चौकार मारण्याची प्रेरणा कुठून मिळाली? असं विचारलं असता बिश्नोईने, "खरं तर कालच मी माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रिल पोस्ट केलेलं. त्यामध्ये केवळ फलंदाजांनीच सर्व आनंद का घ्यायचा? अशी कॅप्शन दिली होती," असं उत्तर देताना प्रश्न विचारणारे कॉमेंटेटरही हसू लागले.
Ravi Bishnoi
"Why should batters have all the fun"pic.twitter.com/d9Wr5IWDRO— (@ayush_tomar8) January 25, 2025
बिश्नोईने आपल्याला तिलकने सावध खेळायला सांगितलं होतं आणि वाकडे तिकडे फटके न मारण्याचा सल्ला दिलेला. तेच मी केलं आणि नाबाद राहिलो, असंही सांगितलं. बिश्नोईने प्रेरणा मिळणाऱ्या ज्या रिलचा उल्लेख केला ते त्याने शुक्रवारच्या सरावानंतर पोस्ट केलं होतं. या रिलमध्ये बिश्नोई एका हातात बॅट तर दुसऱ्या हातात हेल्मेट घेऊन चालताना दिसत आहे. तुम्हीच पाहा हे रिल...
सामन्यानंतरचे पुरस्कार प्रदान करताना सूर्यकुमारला रवि बिश्नोईने उल्लेख केलेल्या रिलसंदर्भात विचारलं असता सूर्यकुमार मनमोकळेपणे हसला. त्याने, "नाही तो (रवि बिश्नोई) खरोखरच नेट्समध्ये घाम गाळताना दिसतो. तो फलंदाजीचा अधिक सराव करत असून फलंदाजीमध्येही योगदान देण्याची त्याची इच्छा असून त्याचे चांगले रिझल्ट दिसत आहेत," असं सांगितलं.