Mumbai Local Train: मध्य रेल्वे कोलमडली! प्रवाशांचे 'मेगा'हाल; शेकडो प्रवाशी ट्रॅकवरुन पायी निघाले

Mumbai Mega Block Local Train News: सुट्टीच्या दिवशीही मुंबईकरांचे दिवसाच्या सुरुवातीलाच प्रचंड हाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेकजण ट्रॅकवर चालताना दिसत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 26, 2025, 08:48 AM IST
Mumbai Local Train: मध्य रेल्वे कोलमडली! प्रवाशांचे 'मेगा'हाल; शेकडो प्रवाशी ट्रॅकवरुन पायी निघाले title=
मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल

Mumbai Mega Block Local Train News: देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच दुसरीकडे मुंबईमध्ये रविवारच्या दिवशीही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना दिवसाच्या सुरुवातीलाच मोठा मनस्थाप सहन करावा लागत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावर प्रजासत्ताक दिन असल्याने रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मेगाब्लॉक सकाळी 8 नंतरही सुरुच असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडून पडल्याचं चित्र पहायला मिळालं. मुंबईच्या दिशेने निघालेल्या लोकल ट्रेन कुर्ला आणि परळ स्थानकापर्यंतच धावत आहे. गोंधळानंतर मध्य रेल्वेने मेगाब्लॉकचा कालावधी वाढवत असल्याची घोषणा केली आहे.

मध्य रेल्वेनं नक्की काय घोषणा केलेली

मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी – मस्जिद दरम्यान 25, 26, 27 जानेवारी आणि 1, 2, 3 फेब्रुवारी रोजी मोठा ब्लाॅक घेण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. या ब्लाॅक कालावधीत मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सीएसएमटी – भायखळा दरम्यान उपलब्ध नसतील, असंही मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे. ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा – सीएसएमटी स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड – सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा या स्थानकांवरून सुटतील. तर, हार्बर मार्गावरील लोकल वडाळा येथून पनवेलच्या दिशेने धावतील. हा ब्लॉक सकाळी साडेपाचपर्यंत असणार होता. मात्र सकाळी आठ वाजल्यानंतरही मेगाब्लॉक सुरुच आहे. 

ट्रॅकवरुन चालत निघाले

त्यामुळेच मुंबईच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांना कुर्ला आणि परळ स्थानकामध्ये अडकून पडावं लागलं. अनेकजण ट्रॅकवर उतरुन चालताना दिसले. मध्य रेल्वेची वाहतूक नियोजित वेळापत्रकापेक्षा एक तास उशीराने सुरु आहे. त्यामुळेच प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमांसाठी मुंबईकडे निघालेल्या तसेच रविवारी कार्यालये सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांना मनस्थाप सहन करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक प्रवाशांनी अचानक मध्य रेल्वेने ब्लॉकचा कालावधी वाढवल्याने हा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे. 

पश्चिम रेल्वेवरही प्रचंड हाल; अनेकांचे वर्क फ्रॉम होम

पश्चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शुक्रवारी रात्रीपासून साडेनऊ तासांचा ब्लाॅक घेण्यात आला होता. या ब्लाॅकचे पडसाद शनिवारी संपूर्ण दिसून आले. लोकल 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. तर, लोकलच्या बिघडलेल्या कारभारामुळे अनेकांनी कार्यालयात न जाता वर्क फ्रॉम होम पसंत केल्याचं दिसून आलं.