...अन् सूर्यकुमार त्याच्यासमोर मैदानातच नतमस्तक! एकट्याच्या जीवावर भारताला जिंकवलं; शेवटच्या ओव्हरमध्ये विजय

India vs England 2nd T20I Highlights: अगदी अटीतटीच्या या सामन्यामध्ये भारतीय संघाने पाहुण्यांना शेवटच्या षटकामध्ये पराभूत केलं. या सामन्यात भारताला विजयासाठी 166 धावा हव्या असताना भारतीय संघातील एकाच खेळाडूने नाबाद 72 धावांची खेळी केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 26, 2025, 08:08 AM IST
...अन् सूर्यकुमार त्याच्यासमोर मैदानातच नतमस्तक! एकट्याच्या जीवावर भारताला जिंकवलं; शेवटच्या ओव्हरमध्ये विजय title=
भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्याचं अनोखं सेलिब्रेशन (फोटो एक्सवरुन साभार)

India vs England 2nd T20I Highlights: भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या टी-20 मालिकेमधील दुसरा सामना भारताने अगदी शेवटच्या षटकामध्ये जिंकला. पहिला सामना एकतर्फी राहिल्यानंतर शनिवारी चेन्नईतील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला सामना अंत्यंत रोमहर्षक ठरला. भारताचा मधल्या फळीतील तरुण फलंदाजाच्या नाबाद खेळीमुळे भारताला इंग्लंडवर निसटता विजय मिळवता आला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय योग्य ठरला. भारताला विजय मिळवून देणाऱ्या या तरुण खेळाडूसमोर भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवही सामना संपल्यानंतर नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं.

इंग्लंडचा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश

प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाला पाहुण्यांना 170 च्या आत रोखण्यात यश आलं. जोस बटलर 45 (30 बॉलमध्ये), ब्रायन कार्स 31 (17 बॉलमध्ये) आणि जेमी स्मिथ 22 (12 बॉलमध्ये) या तिघांनीच भारतीय गोलंदाजांना थोड्याफार प्रमाणात झुंज देण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी विकेट्स पडत राहिल्याने इंग्लंडला कोणतीही मोठी पार्टनरशीप करता आली नाही. भारताकडून अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेख शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. गोलंदाजी केलेल्या भारतीय खेळाडूंपैकी केवळ रवि बिश्नोईला एकही विकेट घेता आली नाही. अक्षरने 4 ओव्हरमध्ये 32 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्तीनेही 4 ओव्हरमध्ये 38 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. हार्दिकने 2 ओव्हरमध्ये केवळ 6 धावा देत एक विकेट घेतली. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 166 धावांचं टार्गेट ठेवलं होतं.

भारताची फलंदाजी कशी झाली?

इंग्लंडप्रमाणेच भारताची सुरुवातही अडखळतच झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये तीन चौकार लगावणाऱ्या अभिषेक शर्माची दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट पडली. अभिषेक बाद झाल्यानंतर मैदानात आलेला तिलक वर्माने नाबाद राहत सामना जिंकवून दिला. त्याने 55 बॉलमध्ये 72 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने 130.91 च्या सरासरीने धावा केल्या. आपल्या खेळीत अभिषेकने 4 चौकार आणि 5 षटकार लगावले. कर्णधार सूर्यकुमार यादव (7 बॉलमध्ये 12 धावा), ध्रुव जुरेल (5 बॉलमध्ये 4 धावा), हार्दिक पांड्या (6 बॉलमध्ये 7 धावा) हे मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्याने भारताचा या सामन्यात पराभव होतो की काय असं वाटू लागलं. मात्र तळाच्या फलंदाजांना योग्य मार्गदर्शन करत तिलक वर्माने कधी संयमी तर कधी आक्रमक फलंदाजी करत विजय मिळवून दिला.

वॉशिंग्टन सुंदरने (19 बॉल 26 धावा) तिलकला उत्तम साथ दिली. अक्षर पटेल (3 बॉल 2) आणि अर्शदीप सिंग (4 बॉल 6) या दोघांना मैदानावर फार काळ टिकता आलं नाही. मात्र नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रवि बिश्नोईने ऐनवेळी चौकार लगावत तिलक वर्मावरील भार हलका केल्याने तिलकला विजयी चौकार लगावत भारताला विजय मिळवून देता आला. भारताला विजयासाठी 166 धावा हव्या असताना तिलकने एकट्यानेच 72 धावा केल्या यावरुनच त्याच्या खेळीचं महत्त्व अधोरेखित होतं. 

सामनावीर पुरस्कार कोणाला?

तिलक वर्माला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या मालिकेतील पुढील सामना 28 तारखेला होणार आहे. भारत या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर असल्याने तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरेल यात शंका नाही.