'तो' प्रश्न ऐकताच आमदार निलेश राणे उद्धव ठाकरेंना म्हणाले 'अडाणी'

Nilesh Rane Slams Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी नोंदवलेल्या एका प्रतिक्रियेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे आमदार असलेल्या निलेश राणेंनी खोचक टोला लगावला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 26, 2025, 07:37 AM IST
'तो' प्रश्न ऐकताच आमदार निलेश राणे उद्धव ठाकरेंना म्हणाले 'अडाणी' title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना केला उल्लेख (प्रातिनिधिक फोटो)

Nilesh Rane Slams Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंचा 'अडाणी' असा उल्लेख केला आहे. शनिवारी चिपळूण दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईमध्ये ठाकरेंचा पक्ष स्वबळावर लढणार या प्रश्नापासून ते राजन साळवी भाजपा किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार यासंदर्भातील प्रश्नांना निलेश राणेंनी उत्तरं दिली. 

ठाकरेंकडे मोजकी माणसं राहिल्याचा चिमटा

चिपळूण दौऱ्यावर असलेल्या निलेश राणेंनी शनिवारी रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. "ठाकरे गटामध्ये मोजके लोक राहिले आहेत. समाजसेवेसाठी लोक राजकारणामध्ये येतात. पक्षाचे प्रमुख भेटत नाहीत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षातून वळणार शिवसेनेकडेच," असं मत नोंदवलं. 

ठाकरेंना स्वबळावरुन टोला

मुंबईमध्ये ठाकरे स्वबळावर लढणार या मुद्द्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता निलेश राणेंनी खोचक प्रतिक्रिया नोंदवत ठाकरेंना टोला लगावला. "स्वबळावर लढू 227 वॉर्ड आहेत. ते आजच्या ताकदीनुसार 27 वॉर्डसुद्धा लढवू शकतात की नाही मला शंका आहे. 27 वॉर्ड लढवायचे असतील तर ते स्वबळावर लढू शकतात. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत," असं निलेश राणे म्हणाले. 

नक्की वाचा >> राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'

कोणत्या प्रश्नावरुन ठाकरेंना म्हणाले 'अडाणी'?

उद्धव ठाकरेंनी संविधानाच्या मुद्द्यावरुन केलेल्या विधानाचा संदर्भ घेत निलेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला. संविधानाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवू असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना संविधानाचं किती ज्ञान आहे? असा प्रश्न विचारला. यावर निलेश राणेंनी, "संविधानात किती पाने आहेत हे उध्दव ठाकरेंना विचारा....अडाणी कुठचे," असं उत्तर दिलं. "उद्धव ठाकरेंना आपण विचारावं की संविधानामध्ये किती पानं आहेत? आपण संविधान वाचलं आहे का? संविधान म्हणजे काय त्यांना विचारा," असंही निलेश राणे म्हणाले. पुढे बोलताना निलेश राणेंनी, "आम्ही संविधान मानणारी. संविधानाने चालणारी लोक आहोत. हा प्रचार झाला. लोकसभेला हा प्रचार चालला तर त्यांना वाटलं हा प्रचार कॅरी फॉरवर्ड होईल. विधानसभेला त्यांचे दात आपटले जनतेनं. अजूनही ते त्यातून काही शिकत नाहीत. उरले सुरलेले दात त्यांना पाडायचे असतील म्हणून ते प्रयोग करत आहेत," असा टोला निलेश राणेंनी लागवला. 

राजन साळवींना काय सल्ला द्याल?

ठाकरेंच्या पक्षातील ज्येष्ठ नेते राजन साळवी भारतीय जनता पार्टी किंवा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. यावरुन निलेश राणेंना, राजन साळवींना काय सल्ला द्याल? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर निलेश राणेंनी, "मी त्यांना सल्ला देणार कोण? आपण सरळ मार्गी माणूस आहे. मी यावर काहीही बोलणार नाही," असं उत्तर दिलं.