Heatwave in Maharashtra: ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांचा मारा सोसत काही मंडळी नागरिकांच्या सेवेसाठी आणि शहरात, राज्यात सुव्यवस्था राखली जावी या हेतूनं महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळं नागरिक आणि यंत्रणांच्या सेवेत असणाऱ्या या मंडळींच्या आरोग्याची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हीच बाब लक्षात घेता आता पोलीस खात्यासह वाहतूक शाखेत नोकरीवर असणाऱ्या पोलिसांना वाढत्या तापमानाच्या धर्तीवर महत्त्वाच्या सूचना देत सतर्क करण्यात आलं आहे.
ही बातमी पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्यांसाठी जितकी महत्त्वाची तितकीच त्यांच्या ओळखीतील व्यक्तींसाठीही महत्त्वाची. कारण, पोलीसांचं लक्ष नसलं तर किमान या मंडळींनी त्यांना या परिस्थितीची जाणीव करून देणं इथं अपेक्षित आहे.
सध्या तापमानाचा दाह पाहता उष्माघाताचे शिकार होऊन पोलिसांसोबतही कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला 55 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना Field duty न देता कार्यालयीन कामकाज देण्यात येणार आहे.
रक्तदाब, दमा, मधुमेह या आणि अशा काही इतर व्याधी असल्यास त्या कर्मचार्यांनाही दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या वेळेत कार्यालयीन कामकाज देण्यात येणार आहे.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी On Duty असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा आढावा घ्यावा.
- दुपारच्या वेळेत ड्युटी असल्यास तिथं पोलिसांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करणं.
- पोलिसांनी टोपीचा वापर करावा
- वाहतुक कोंडीच्या ठिकाणी तरुणी आणि सशक्त पोलिसांची नियुक्ती करावी.
- चक्कर येणं किंवा छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यास तात्काळ रुग्णालयात जाणं
भर उन्हामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या पोलिसांचं हित आणि त्यांचंही आरोग्य केंद्रस्थानी ठेवत पोलिस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांनी या प्रतिबंधात्मक सूचना केल्या. यावेळी त्यांनी एखादी शस्त्रक्रिया किंवा आणखी काही शारीरिक अडचणी असणाऱ्या पोलिसांनाही ही मुभा देण्याचा उल्लेख केला.