अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: सध्या कोरोनामुळे ग्रामीण भागातील अनेकांचे रोजगार बुडाले असताना शेतकऱ्यांचीही अवस्था फारशी वेगळी नाही. अमरावतीमध्ये तर पोटाची खळगी भरण्यासाठी कापसाचे पीक घेणारे अनेक शेतकरी घरदार सोडून जीवाची पर्वा न करताना रात्रभर जागत आहेत. हे शेतकरी सुखाच्या झोपेसाठी व्याकूळ झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागीर येथील जिनिग प्रेसिंगमध्ये कापूस विकायला आलेले शेतकरी यंदा अनेक अडचणींचा सामना करत आहेत. सायंकाळी कापूस टाकायचा आणि कापूस विक्रीसाठी तो खरेदी केंद्रांवर आणायचा दिवस उजाडेपर्यंत तिथचं थांबायचं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत कापूस खरेदी होईपर्यंत ताटकळत उभं राहायचं. अशावेळी आजुबाजूला जंगल परिसरात असणारे साप आणि विंचू यांच्यापासून वाचत या शेतकऱ्यांना उघड्यावर रात्र काढावी लागत आहे.
यावर्षी कोरोनामुळे मध्यंतरी दोन महिने कापूस खरेदी थांबली होती. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात कशीबशी ९ कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली. परंतु कापूस खरेदी करणाऱ्या केंद्राची संख्या ही कमी असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुसऱ्या दिवशी कापसाच्या गाडीचा नंबर लावण्यासाठी आदल्या रात्रीपासून शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन प्रतीक्षेत थांबावं लागते. ज्या ठिकाणी शेतकरी थांबतात त्या ठिकाणी ना पाणी, ना लाइट, ना झोपायला कुठलीच व्यवस्था नाही. भर पावसात शेतकरी जीव मुठीत घेऊन रात्र काढत असताना मात्र शेतकऱ्यांसाठी कुठलीही व्यवस्था येथे करण्यात आलेली नाही.
अमरावती जिल्ह्यात सध्या एकूण ९ कापूस खरेदी केंद्र आहे. ज्या मध्ये सीसीआय चे २, कापूस पणन महासंघ चे ७ केंद्र आहे. यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख २३० शेतकऱ्यांचा १३ लाख १३ हजार २०२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून ४ हजार ९६ शेतकऱ्यांचा १ लाख क्विंटल कापसाची खरेदी अद्यापही बाकी आहे. एकीकडे पेरणी होऊन एक महिला उलटला आहे. आता पिकाला खते, फवारणी करणे गरजेचे असताना तात्काळ खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.