लक्ष्मीकांत रुईकर, झी २४ तास, बीड : 'धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या बहिणीबद्दल नीच वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शरद पवार, अजित पवार यांच्यासहीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निषेध व्यक्त करावा. तसंच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या या कारनाम्याबद्दल आपली भूमिका जाहीर करावी' अशी मागणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलीय. रविवारी, आष्टी इथे महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांचा निषेध करण्यासाठी आपण मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
धनंजय मुंडे यांचा विडा येथील जाहीर सभेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यानंतर, शनिवारी परळीमध्ये भाषणानंतर पंकजा मुंडे यांना स्टेजवरच भोवळ येऊन त्या मंचावर कोसळल्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या क्लीपमध्ये त्यांनी पंकजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे ऐकायला मिळत आहे. ही क्लीप पाहूनच हळव्या स्वभावाच्या पंकजा मुंडेंना चक्कर आल्याचा आरोप धस यांनी केलाय.
'ज्या बहिणीने २९ वर्ष राखी बांधली त्या बहिणीबद्दल असं बोलताना यांना लाज कशी वाटली नाही? एकीकडे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल पुळका दाखवायचा अन् दुसरीकडे स्वतःच्या बहिणीबद्दल असं बोलताना यांना लाज कशी वाटली नाही' असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आगपाखड केलीय.
दरम्यान, या प्रकरणानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर बदनामीकारक हातवारे करून महिलेची बदनामी केल्या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कलम ५०० (महिलांसाठी अपमानकारक शब्द वापरणे), ५०९ (शाब्दिक छेडछाड) आणि २९४ (अश्लील हातवारे करणे) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. परळी पोलिसांत जुगलकिशोर लोहिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.