Anajali Damania meets Ajit Pawar: धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेतला नाही, तर मी कोर्टात जाईन असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) दिला आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सतत आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सर्व पुरावेही अजित पवारांसमोर सादर केले आहेत. तसंच अजित पवारांनी आपण उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यात यावर चर्चा करु असं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.
"25 ते 30 मिनिटं आमची भेट झाली. बीडमध्ये जे झालं ते माणुसकीला काळीमा फासणारं असून, मी त्याचं समर्थन करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मग माझंही तेच म्हणणं होतं की, मग तुम्ही राजीनामा का घेत नाही? मी सर्व पुरावे घेऊन त्यांच्या भेटीला गेले होते. मी आज त्यांना दाखवलं की कशाप्रकारे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्रित बिझनेस कसे आहेत. त्याच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळत आहे. कसं ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये हे सगळं बसत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राजीनामा घेतला पाहिजे. त्यासाठी मी त्यांनी गृहमंत्रालयाने आमदार, मंत्र्यांना दिलेले निर्देश दाखवले. कायद्यानुसार कोणताही आमदार किवा मंत्री स्वत: किंवा घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही. तरीही महाजनकोकडून यांना कसा नफा मिळत आहे याची कागदपत्रं दाखवले आहेत," अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, "त्यानंतर मी त्यांना त्यांची दहशत दाखवली. त्यांचे समर्थक हे दहशतवादी आहे. त्यांनी बीडमध्ये जी दहशत निर्माण केली आहे त्याचे फोटो, रिल्स अत्यंत शांतपणे पाहून घेतले आहेच. त्यांनी सांगितलं आहे की, उद्या दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांसह बैठक आहे. त्यात ती सर्व कागदपत्रं सादर करत मुख्यमंत्र्यांसह चर्चा करुन निर्णय घेतील".
"जनतेचा आक्रोश आहे. जे कृत्य केलं ते इतकं निर्घृण होतं की महाराष्ट्रात आता अशा कृत्यांना थारा देऊ नये यासाठी हा लढा आहे असंही मी त्यांना सांगितलं. त्यांचंही तेच म्हणणं होतं की, संतोष देशमुख यांच्यासोबत जे झालं तसं यापुढे असं परत महाराष्ट्र होऊ नयेत. यामुळेच मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेणं आवश्यक आहे असं सांगितलं. त्यांनी उद्या मुख्यमंत्र्यांसह चर्चा करुन एकत्र निर्णय घेऊ म्हटलं आहे", अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.