Bhiwandi Crime: भोंदू बाबांवर विश्वास ठेवू नका, असे वारंवार सांगण्यात येते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासाठी दिवसरात्र काम करत असते. तरीही लोकांना भोंदू बाबांची भुरळ पडते आणि त्यांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होतो. भिवंडीत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.
भोंदू बाबाच्या नादी लागणं एका महिलेला खूप महागात पडलंय. पतीचे आजारपण तसेच मुलांवरील काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करायची आहे असं सांगून महिले कडून 8 लाख 87 हजार उकळण्याचा प्रकार भिवंडीतून समोर आलायं.या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे अख्तर अलीम अन्सारी अस फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून ती भिवंडीतील मिल्लतनगर मध्ये राहते. हजरत बाबा उर्फ अमजद असद खान असे फसवणूक करणारा व गुन्हा दाखल झालेल्या भोंदू बाबाचे नाव आहे.
महिलेचे पती अख्तर हे सतत आजारी असायचे. त्यांच्यावर अनेक दिवस उपचार होते पण काही गुण येत नव्हता. 2023 मध्ये ग्राहक म्हणून आलेल्या हजरत बाबा याच्याशी महिलेची ओळख झाली. काळ्या जादूमुळे हे आजारपण आणि इतर त्रास होत असल्याचे त्या भोंदू बाबाने महिलेला सांगितले. पिडीत महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या समोर घरात केलेल्या पुजे दरम्यान अंड्या मधून खिळा काढून दाखवला.
तुमच्या मुलावर कोणीतरी काळी जादू केली असून मुलावरील काळी जादू न उतरवल्यास 6 महिन्यात तो जीव गमावून बसेल अशी भीती भोंदू बाबाने तिला दाखवली. एवढेच नव्हे तर तिला घरातील दु:ख संपवण्यासाठी एक अघोरी प्रकार सांगितला. काळी जादू संपवण्यासाठी कब्रस्तानातील मृतदेह आणावा लागेल. त्यातून पती आणि मुलावरील त्रास संपेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारून दुकानसुध्दा चांगले चालेल असे भोंदू बाबाने तिला सांगितले.
हळुहळू महिला त्या भोंदू बाबाच्या भूलथापांना बळी पडू लागली होती. भोंदू बाबा जे सांगेल त्यावर विश्वास ठेवू लागली. चांदवड मालेगाव येथे मृतदेह मिळणार असल्याचे सांगत पीडित कुटुंबीयांना बाबा चांदवड मालेगाव येथे घेऊन गेला. बाबाच्या साथीदाराने 10 लाख रुपयांत मृतदेह मिळेल असे सांगितले. हजरत बाबाने घासाघीस करून 8 लाख रुपयांत सौदा पक्का केला. परंतु त्यानंतर भोंदू बाबा याने कोणताही मृतदेह न आणता एका बॉक्स मध्ये खोटा मृतदेह आणला. पण महिलेला खरे वाटावे म्हणून भोंदू बाबाने तिला एका वेगळ्या मृतदेहाचा फोटो पाठवला.
पैसे घेताना पीडित कुटुंबीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी महिलेला एका मृतदेहाचा फोटो मोबाईल वर पाठवून दिला. गरीब महिलेचा यावर विश्वास बसला. आधीच पैसे नसल्याने पीडित कुटुंबीय आधीच कर्जबाजारी होते. पण याच भोंदू बाबाने पीडित कुटुंबीयाला एका खासगी सावकाराशी ओळख करुन दिली. महिना 9 टक्के व्याजाने 3 लाख रुपये कर्जाने मिळवून दिले. पण भोंदू बाबाने आपली फसवणूक केल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आले. यानंतर पीडित महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांच्याशी संपर्क साधला.
सुजाण नागरीकांनी अंधश्रध्देच्या आहारी न जाता वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारला पाहीजे अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भिवंडी शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर गोसावी यांनी दिली असून या प्रकरणात पिडीत कुटूंबाला आधार देऊन त्यांना न्याय मिळावा व या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी व भविष्यात अशा घटना होऊन कोणाचेही मानसिक, शारिरीक किंवा आर्थिक शोषण होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी ज्ञानेश्वर गोसावी यांनी केली आहे.