बीड : परळीतून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जोरदार धक्का देत पराभूत केले होते. त्याआधीच्या निवडणुकीत बहीण पंकजाने धनंजय यांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्हा परिषद निवडणुकीत (Beed ZP President Election) भाजपला (BJP) पराभव पत्करावा लागला आहे. यावेळी भाजपमधून बंडखोरी झाली आहे. दोन बंडखोर उमेदवारांनी राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने (NCP) शिवसेना, काँग्रेस आणि भाजप बंडखोरांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी शिवसेनेचे सदस्य आपल्या संपर्कात आहेत, असे सूचित केले होते. त्यांचा नाईलाज आहे. त्यामुळे ते लोकशाहीत ठिकविण्यासाठी आपल्यासोबत नाहीत, असे म्हटले होते. मात्र, भाजपमध्येच बंडखोरी झाल्याने भाजपला हा मोठा धक्का आहे.
विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभव केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषध अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पराभवाचा धक्का दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची निवड झाली आहे. दरम्यान, अधिकृत निकाल १३ जानेवारीला तारखेला जाहीर होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना, भाजप बंडखोर आणि काँग्रेसच्या सदस्यांनी मदत केली. त्यामुळे आजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शिवकन्या सिरसाट या बीड जिल्हा परिषद (Beed Zilla Parishad) अध्यक्ष म्हणून तर बजरंग सोनवणे हे उपाध्यक्ष म्हणून ३२ मते घेऊन विजयी झालेत. भाजपच्या उमेदवार योगिनी थोरात यांना २१ मते मिळालीत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बीड जिल्हा परिषदमध्ये सत्ता परिवर्तन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश धस आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या पाच सदस्यांनी भाजपला उघड मदत केली होती. त्यानंतर पाच सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. या सदस्यांनी यावेळी मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर १३ जानेवारी रोजी सुनावणी झाल्यावर अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते.
दरम्यान, शनिवारी झालेल्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे २३, काँगेसचे ३ ,शिवसेनेचे ४ आणि भाजपच्या बंडखोर २ सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादील सहज विजय प्राप्त करता आला.