सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचा बस्ता खरेदीसाठी कपड्याच्या दुकानात गेलेल्या एका तरुणीला चक्क फरशी पुसण्याचं केमिकल प्यायला दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नेमकी काय आहे घटना
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लग्नाचे कपडे खरेदीसाठी अनेक दुकानांमधून गर्दी होत आहे. पंढरपूर शहरातील आविष्कार या कपडे दुकानात गोपाळपूर मधील एक कुटुंब आपल्या लग्न ठरलेल्या मुलीसह बस्ता खरेदीसाठी गेले होते. खरेदी सुरु असताना तरुणीला तहान लागली म्हणून तीने दुकानात असलेल्या कामगारांकडे पाणी मागितलं.
पण तिथे पाण्याच्या बाटलीत फरशी पुसण्यासाठी लायझल केमिकल ठेवलं होतं. कामगारांने चुकून पाणी म्हणून केमिकलची बाटली त्या तरुणीला दिली. तहानलेल्या तरुणीनेही पाणी समजून बाटली तोंडाला लावली. पण केमिकलमुळे तिच्या घशात जळजळ होऊ लागली. पाणी समजून केमिकल प्यायला दिल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले.
यांनतर तातडीने तरुणीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेबाबत पंढरपूर शहर पोलिस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.