अभिषेक आदेप्पा, झी २४ तास, सोलापूर: मविआच्या जागावाटपाचं घोंगडं भिजत असतानाच दक्षिण सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे पक्षात वादाचा भडका उडालाय. उद्धव ठाकरे विरुद्ध खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) असं या संघर्षाला स्वरुप आलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षानं दक्षिण सोलापूर मतदारसंघात अमर पाटलांना ए.बी.फॉर्म दिला आहे. ठाकरे गटाला जागा सुटलेली नसताना ठाकरेंच्या पक्षानं अमर पाटलांना एबी फॉर्म दिल्यानं प्रणिती शिंदे संतापल्याच कळतंय.
दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेस लढवणार असल्याचा विश्वास प्रणिती शिंदेंनी व्यक्त केला आहे. दिल्लीतल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर सोलापूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना प्रणिती शिंदेंनी निरोप पाठवला. दक्षिण सोलापूरची जागा आपणच लढवणार असल्याचं प्रणिती शिंदेंनी सांगितल होतं.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांपेक्षा अमृता फडणवीस अधिक श्रीमंत; पण नावावर एकही गाडी नाही; जाणून घ्या एकूण संपत्ती
दक्षिण सोलापूरमधून शिवसेना ठाकरे पक्षानं अमर पाटलांना ए.बी.फॉर्म दिल्यावर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली. काँग्रेसकडून इच्छूक माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसची असल्याचा दावा करत त्यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला कडाडून विरोध केला. सोलापुरातही सांगली पॅटर्न राबवा, असं आवाहन कार्यकर्त्यांनी दिलीप माने यांना केलं आहे.
दक्षिण सोलापूरवरून मविआत वाद झाल्यास त्याचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर दक्षिणवरून उठलेलं वादळ पेल्यातच शमवण्याचा मविआचा प्रयत्न राहणार आहे. तसं झालं नाही तर दक्षिण सोलापूरवरुन उद्धव ठाकरे विरुद्ध प्रणिती असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.