Ajit Pawar Kolhapur : उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते पूर्वनियोजित रुपरेषेनुसार काही ठिकाणांना भेट देत काही महत्त्वाच्या विषयांमध्ये लक्ष घालणार आहेत. सोमवारी (29 जानेवारी 2024) ला सकाळीच अजित पवार कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी श्री शाहू विजय गंगावेस तालमीला भेट दिली आणि या भेटीमध्ये त्यांनी तालमीच्या एकूण परिस्थितीची पाहणी केली. अजित पवार यांनी यावेळी काही अधिकाऱ्यांना धारेवर धरत सकाळ सकाळ एका फोनवरून त्यांची कानउघडणी केल्याचं पाहायला मिळालं.
तालमीचा विकास करायचा झाल्यास कशाप्रकारे नियोजन केलं पाहिजे, ऐतिहासिक महत्त्व कसं टिकवलं पाहिजे, नेमक्या किती मल्लांची सोय केली पाहिजे या संदर्भात तालमीच्या प्रमुखांशी चर्चा करत उपमुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. या साऱ्यामध्ये अजित पवार यांचं चौफेर लक्ष असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
कोल्हापुरात अजित पवार भलतेच अॅक्शन मोडमध्ये दिसले आणि त्यांच्या कचाट्याच सापडले ते म्हणजे काही अधिकारी. इथं तालमीची परिस्थिती पाहण्यासाठी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आलेले असताना क्रीडा अधिकारी मात्र घरीच होते. ही बाब लक्षात येताच अजित पवार यांनी तडक PWD अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधत त्यांना तातडीनं तालीन येण्याच्या सूचना केल्या.
उपमुख्यमंत्र्यांच्या फोननंतर अधिकारी लगेचच तालमीत दाखल झाले. ज्यानंतर तालमीच्या प्रमुखांची चर्चा केल्यानंतर क्रीडा अधिकारी आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी तालमीत बोलावून घेत त्यांना तालीम विकास आराखडा तयार करण्याचे तोंडी आदेश दिले. यावेळी विकास करत असताना पैलवानांना जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळाव्यात याची दक्षता घेण्याची सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली.