First Non Congress Chief Minister Of Maharashtra Manohar Joshi Death: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे 3 वाजता निधन झालं आहे. 86 वर्षीय मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय तसेच महाराष्ट्राचे पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री अशी मनोहर जोशींची ओळख होती. बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींवर विश्वास ठेऊन त्यांच्याकडे शिवसेना-भाजपा युतीच्या राज्यातील पहिल्या विजयानंतर 1995 साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र बाळासाहेबांनी हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या सल्लाने घेतल्याचा दावा ‘आधारवड’ या पुस्तकात करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं.
शरद पवारांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेणारं हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं. याच पुस्ततकामध्ये मनोहर जोशी पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री पवारांच्या सल्ल्यानेच झाल्याचा उल्लेख आहे. 1995 साली पहिल्यांदा शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर सुधीर जोशींचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित झाले होते, पण मनोहर जोशींनी मुख्यमंत्री करावे, असा सल्ला शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिला. त्यानंतरच मनोहरपंत मुख्यमंत्री झाले, असा उल्लेख ‘आधारवड’मध्ये आहे. सध्या शरद पवारांपेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेणाऱ्या अजित पवार, सुनील तटकरे, आदिती तटकरे यासारख्या नेत्यांबरोबरच हेमंत टकले, निरंजन डावखरे, प्रसाद लाड यांच्या पुढाकारातून हे पुस्तक त्यावेळी तयार करण्यात आलं होतं हे विशेष.
राष्ट्रवादीच्या या पुस्तकामध्ये ‘पवारांच्या जीवनातील 55 वर्षांतील महत्त्वाची घटना’ अशा मथळ्याखालील प्रकरणामध्ये मनोहर जोशींच्या मुख्यमंत्री होण्याच्या घटनाक्रमाचा उल्लेख आहे. मनोहर जोशींच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या उल्लेखात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने पवारांवर टीका केली होती असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यावेळी बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. युतीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी शरद पवारांचा सल्ला ऐकून मनोहर जोशींना मुख्यमंत्री केल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. या घटनाक्रमाचा उल्लेख करत तेव्हाच्या राजकीय वर्तुळात पवारांचे महत्त्व वाढल्याचा निष्कर्ष पुस्तकात काढण्यात आला आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे राजकीय दृष्ट्या विरोधी विचारसरणीचे होते तरी त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती.
नक्की वाचा >> मनोहर जोशी म्हणालेले, 'राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात...'
राजकीय वर्तुळात मनोहर जोशींना प्रेमाने 'जोशी सर' म्हटले जायचे. जोशी यांनी 1970 च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौरही होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जोशी हे 4 वर्षे (1995-1999) शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते, जेव्हा पक्षाने भाजपासोबत युती करून महाराष्ट्रात सत्ता मिळवलेली. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात मनोहर जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष (2002-2004) म्हणून काम केले होते. जोशी हे मुंबई सेंट्रल मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी 6 वर्षे काम केले आहे.