जनतेने सतर्क राहायचे म्हणजे काय? ‘गो गुलियन गो’ नारे लावायचे की..; ठाकरेंच्या सेनेचा सरकारवर हल्लाबोल

Guillain Barre Syndrome In Maharashtra: "सरकारच्या हातापायाला व मेंदूलाही मुंग्याच आल्या आहेत आणि सरकारचा मेंदू काम करेनासा झाल्याची लक्षणे दिसत आहेत. असे हे सरकार जीबीएस आजाराशी कसे लढणार?"

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 30, 2025, 06:57 AM IST
जनतेने सतर्क राहायचे म्हणजे काय? ‘गो गुलियन गो’ नारे लावायचे की..; ठाकरेंच्या सेनेचा सरकारवर हल्लाबोल title=
ठाकरेंच्या सेनेचा टोला

Guillain Barre Syndrome In Maharashtra: "राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोमने कहर माजवला आहे. हा एक गंभीर आजार राज्यात वाऱ्यासारखा पसरला आहे. महाराष्ट्रात ही अशी आरोग्यविषयक आणीबाणी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी गेले आहेत. कोरोनाप्रमाणे या आजाराचा प्रसारही चीनमधूनच झाला आहे व भारतावर त्या हल्ल्याचा प्रभाव दिसू लागला आहे. राज्यावर हे आरोग्यविषयक संकट कोसळले असताना सरकार आपापसातील हेवेदावे, मान-अपमानामुळे कोमात गेल्याची लक्षणे आहेत," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. "जीबीएस आजाराचे एकट्या पुण्यातच सव्वाशे रुग्ण आहेत. त्यातील शंभरवर रुग्ण पाच किलोमीटरच्या परिघातील आहेत. त्या आजाराने ग्रासलेले 14 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएसचा पहिला हल्ला पुण्यावर झाला आहे. त्यामुळे पुण्याची जनता भयभीत होणे स्वाभाविक आहे. कोयता गँगच्या दहशतीने पुणे आधीच भीतीच्या सावटाखाली आहे. त्यात हा जीबीएस आजाराचा कहर. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली व सांगितले, ‘‘हा आजार संसर्गजन्य नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी.’’ अजित पवार हे वैद्यकीय डॉक्टर नाहीत व राज्याचे आरोग्यमंत्री आबिटकर हेसुद्धा याबाबत अगाध ज्ञानी आहेत. आजार संसर्गजन्य नाही. मग एकाच परिघात तो वाऱ्यासारखा पसरला कसा? चीनमधून देखील भारतात पसरला कसा?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

परिस्थिती एवढी गंभीर असली तरी महाराष्ट्रातील...

"मंत्रिमंडळात याबाबत जो तो आपले ज्ञान पाजळत आहे, पण त्या आजाराबाबत सत्य हेच आहे की, हा दुर्मिळ आजार आहे. तो विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. या आजाराने थकवा येतो. हातापायाला मुंग्या येतात. श्वास घेताना अडथळे येतात. जीव घाबरा होतो. ही लक्षणे गंभीर आहेत. जीबीएस हा एक असा विचित्र आजार आहे, यात रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते. ही शक्ती शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते. नसांना प्रभावित करते. त्यामुळे मेंदूच्या कामकाजावर गंभीर परिणाम होतो. ही लक्षणे गंभीर आहेत व रुग्णाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. महाराष्ट्रात सध्या या गंभीर आजाराने पुण्याशिवाय सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये हातपाय पसरले आहेत. सोलापुरात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 110 च्या पुढे गेली आहे. परिस्थिती एवढी गंभीर असली तरी महाराष्ट्रातील सरकार स्वतःच या आजाराने ग्रस्त असल्याप्रमाणे वागत आहे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

"गो गुलियन गो’ असे नारे रुग्णालयाबाहेर द्यायचे की..."

"सरकारच्या हातापायाला व मेंदूलाही मुंग्याच आल्या आहेत आणि सरकारचा मेंदू काम करेनासा झाल्याची लक्षणे दिसत आहेत. असे हे सरकार जीबीएस आजाराशी कसे लढणार, गुलियन बॅरी सिंड्रोमबाबत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नेमकी कोणती कठोर पावले उचलली आहेत, ते समजायला मार्ग नाही. की भाजपच्या धोरणानुसार ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने गुलियन सिंड्रोम पळून जाईल? ‘गो कोरोना गो’ अशा घोषणांप्रमाणे ‘गो गुलियन गो’ असे नारे रुग्णालयाबाहेर द्यायचे की घंटा, थाळ्या, चमचे-वाट्या वाजवून गुलियनविरोधात लढा पुकारायचा याबाबतचे स्पष्ट मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. लोकांच्या मनात गुलियनची भीती आहे व सरकार बिनधास्त आहे. हा आजार नेमका काय व कसा याची पाहणी करण्यासाठी म्हणा, केंद्राचे एक पथक महाराष्ट्रात आले व कोणतीही पाहणी न करता निघून गेले. हे खरे असेल तर गुलियन आजारापेक्षा ही बाब गंभीर आहे," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.

जनतेने सतर्क राहायचे आहे म्हणजे काय?

"या आजारामुळे ‘लकवा’ मारण्याचा धोका सर्वात जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत विशेष माहिती समोर आणली. अर्थात, जागतिक आरोग्य संघटना हीसुद्धा एक व्यापारी वृत्तीचा खेळखंडोबाच आहे. आजारावर नियंत्रण आणण्यापेक्षा औषध कंपन्यांना मदत होईल अशीच धोरणे ती राबवत असते व त्यादृष्टीने एखाद्या आजाराबाबत भय निर्माण करते. तरीही जागतिक आरोग्य संघटना आजाराबाबत जे सांगत आहे ते गांभीर्याने समजून घ्यावे लागेल. या आजाराबाबत जनतेने सतर्क राहायचे आहे म्हणजे काय? वास्तविक सतर्क सरकारने राहायला हवे. म्हणे, पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्या, पण राज्यातील 60 टक्के लोकांना पिण्याचे स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळत नाही त्याचे काय? स्वच्छ आणि ताजे अन्न खाण्याच्या सूचना आहेत, पण अर्धपोटी जनता या स्वच्छ किंवा ताज्या अन्नाची सोय कशी करणार? वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना आरोग्य संघटनेने दिल्या. या सूचनाही नागरिकांना देण्यापेक्षा या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी त्या त्या देशाच्या व राज्यांच्या सरकारांवर आहे आणि सरकारनेच ‘सतर्क’ राहून हे सर्व नागरिकांना पुरवावे असे आरोग्य संघटनेने साफ बजावायला हवे," अशी अपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.

शिंद्यांनी गुलियनवर पैशांचा पाऊस पाडल्याने हा व्हायरस वाहून जाईल?

"प्रयागराजच्या कुंभमेळ्यात साधारण 20 कोटी लोक येतील. रोजचा एक कोटीचा आकडा आहे. तेथे शेवटी चेंगराचेंगरीत मृत्यू झाले. तेथील स्वच्छता व आरोग्य व्यवस्था ‘गुलियन’ला पोषक असेल तर सरकारने याबाबतही सतर्क राहायला हवे. महाराष्ट्रात ‘गुलियन’ शिरला आहे व मंत्री परिषद त्याबाबत सतर्क नाही. मुख्यमंत्री तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. खरे तर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील प्रचार दौरा थांबवून ‘जीबीएस’ रोखण्यासाठी म्हणजे गुलियनला संपविण्यासाठी महाराष्ट्रातच थांबायला हवे होते, पण राजकीय कर्तव्य, निवडणुका, महत्त्वाच्या असल्याने महाराष्ट्रात गुलियनला मोकाट सोडून मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. गुलियनवर ‘ईव्हीएम’ फेकून मारल्याने त्याची पीछेहाट होईल की शिंद्यांनी गुलियनवर पैशांचा पाऊस पाडल्याने हा व्हायरस वाहून जाईल? लोकांना काहीच कळेनासे झाले. लोक घाबरलेले आहेत. गुलियनचे करायचे काय? हा प्रश्नच आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.