Maharashtra Rain : मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील पेरमिली नाल्यात एक ट्रक वाहून गेलाय. या ट्रकमधून पाच ते सहा जणं प्रवास करत होते. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाहीये... SDRFचं पथक या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहे. काल रात्री ही दुर्घटना घडली.. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक नाल्यात पडल्याची प्राथमिक माहिती हाती लागलीय.
कोल्हापूर पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. गेल्या 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलीय. आज पाणी पातळी 32 फूट 9 इंचावर जावून पोहचलीय. पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फूट असून धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यात अतिवृष्टी झालीय. तर आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यात देखील मुसळधार पाऊस पडतोय. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. पंचगंगा नदी देखील पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली असून या नदीवरील 34 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
अमरावतीत पावसाची जोरदार बॅटिंग
अमरावतीच्या मेळघाटात रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामळे अनेक नदी नाल्या दुधडी भरून वाहतायेत. तर दिया इथल्या सिपणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दिया गावातील एक आदिवासी युवक पूल ओलांडत असताना वाहून गेलाय. कृष्णा कासदेकर असं युवकाचं नाव असून, तो अजून बेपत्ता आहे. नदीच्या पुलावरून 10 फूट उंच पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे नदीच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान नदीकाठील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे.
साताऱ्यात पूल पाण्याखाली
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं कसणी गावाजवळचा पुल पाण्याखाली गेलाय. यामुळे कसणी, निगडे, घोटील म्हाईंगडेवाडी यासह अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे महिंद धरण ओव्हरफ्लो झालं आणि याचं पाणी रस्त्यावर आलं. त्यामुळे पुलं पाण्याखाली गेलाय.
नाशिकमध्ये काही गावांना सतर्कतेचा इशारा
नाशिकच्या चांदोरी इथं गोदावरी नदीला परिसरातील नदी, नाले, ओढे तुडूंब भरलेत. यामुळे चांदोरी गावच्या विठ्ठल वाडी, कडाळे वस्ती, शिंदे मळा, वडरे मळा या सर्व रहिवाशांना सतर्केचा इशारा देण्यात आलाय. संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. तसंच नांदूरमधमेश्वर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आलेत.