मुंबई : तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये राहात असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुमची जागा कुणाच्या नावावर आहे. बिल्डरनं तुम्हाला फसवू नये, यासाठी डिम्ड कन्व्हेयन्स महत्त्वाचा आहे.
तुमच्या बिल्डिंगची जागा कुणाच्या नावावर आहे ?, तुमचा बिल्डर तुम्हाला फसवतोय का ?, तुम्हाला अजून डिम्ड कन्व्हेयन्स मिळालेला नाही का ? मग ही बातमी तुमच्याचसाठी आहेच.
डिम्ड कन्व्हेयन्स मिळवण्याबद्दल तुम्ही अजूनही गाफील असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं आम्ही सांगतो आहे. बिल्डिंग बांधून ती रहिवाशांच्या ताब्यात दिली की ती जागा सोसायटीच्या नावावर करायची असते. पण अनेक बिल्डर्स हा डिम्ड कन्व्हेयन्स देत नाहीत, त्यामुळे पुढे अनेक अडचणी येतात. जास्तीत जास्त हाऊसिंग सोसायटय़ांची जागा त्यांच्या नावावर व्हावी म्हणून राज्य सरकारनं 1 जानेवारीपासून विशेष मोहीम सुरू केली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात जवळपास पावणे दोन लाख सहकारी हाऊसिंग सोसायटया आहेत. पण बऱ्याचशा बिल्डर्सनी जागा सोसायट्यांच्या ताब्यात दिलेली नाही. त्यामुळे बिल्डिंग रिडेव्हलपमेंटमध्ये अडचणी येतात. बिल्डरच्या परवानगीशिवाय रिडेव्हलपमेंट करता येत नाही. बऱ्याचवेळेला रहिवाशांकडून पैसेही उकळले जातात. हे सगळं टाळण्यासाठी डिम्ड कन्व्हेयन्स गरजेचा आहे. सोसयटीतल्या 51 टक्के सभासदांनी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकाकडे अर्ज करायचा. त्यानंतर जमिनीची मालकी सोसायटयांना दिली जाते.
तुमच्या सोसायटीच्या डिम्ड कन्व्हेयन्सबद्दल वेळीच जागे व्हा. तुमच्या सोसायटीचा डिम्ड कन्व्हेयन्स आहे की नाही, याची खात्री करा. नसेल तर सरकारनं तुमच्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेचा लगेचच फायदा घ्या. एखादी दुर्घटना घडल्यानंतर किंवा बिल्डिंगची रिडेव्हलपमेंटची वेळ आल्यावर धावाधाव करण्यापेक्षा अत्ताच जागे व्हा.