Eknath Shinde Group : अजित पवार यांचा मोठा गट शिंद फडणवीस सरकार मध्ये सामील झाला आहे. राष्ट्रावादी सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी थेट मंत्रीपदाची शपत घेतल्याने मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेले शिंदे गटाचे आमदार नाराज झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिंदे गटाचे आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. तसेच शिंदे गटात कुणीही नाराज नाही तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. कुणीही दिवास्वप्नं पाहू नयेत, असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेची महत्त्वाची बैठक झाली, या बैठकीनंतर त्यांनी हा दावा केला. राष्ट्रवादीच्या सहभागामुळं शिवसेनेत कुणीही नाराज नाही, असं सांगतानाच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि शिंदेंच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढवल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होण्याचं कारण नाही.विरोधक संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री व्हावं ही आपली इच्छा आहे असं अजित पवारांनी थेट बोलून दाखवल आहे. लोकांनी मला 5-5 वेळा उपमुख्यमंत्री केलं. माझ्या नावावर उपमुख्यमंत्रीपदाचा रेकॉर्ड आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपदावरच सगळ अडचं अशी खंत अजित पवारांनी बोलून दाखवली आहे.
राष्ट्रवादीतला अजित पवार गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे. आधी शपथविधी करून मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्या आणि त्यानंतर खातेवाटप करा असा आग्रह शिंदे गटानं धरल्याचं माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच आता अजित पवार गटाचं खातेवाटप लांबल्याचं समजतंय. त्यामुळे तिस-या टप्प्यातला शपथविधी झाल्याशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची खातेवाटपासंदर्भात बैठक झाली. त्यानुसार अजित पवार अर्थमंत्री होणार अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर अर्थ, सहकार खातं राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र खातेवाटपाबाबत मतंमतांतर असू शकतात असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. त्यामुळे खात्यांवरून मतभेद असल्याची चर्चा रंगू लागली.