आतिश भोईर, झी २४ तास, कल्याण : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांच्याकडून ३ लाखांची खंडणी घेताना तरूणीला अटक करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे तरुणीने याआधी दोन वर्षांपूर्वी याच नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता मात्र या गुन्ह्यात त्यांची निर्दोष सुटका झाली होती. आता पुन्हा ही तरूणी नगरसेवकाला धमकी देत होती. खंडणी वसूल करण्यासाठी ही तरूणी गायकवाड यांच्या कार्यालयातही आली. तिथे तिने पैशांचे बंडल ताब्यात घेतल्यावर लगेच पोलीस आले आणि त्यांनी तरूणीला रंगेहात अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रीत झाला असून बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाकी तरूणी खंडणी वसूल करत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक दया गायकवाड यांच्यासोबत हा प्रकार घडलाय. गंभीर बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी याच तरूणीने गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यावेळी त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. आता पुन्हा या तरूणीने हा प्रकार सुरू केला.
खंडणी वसूल करण्यासाठी ही तरूणी नगरसेवकाच्या कार्यालयात आली. प्रथम तिने पैशांचं बंडल बॅगेत टाकले. त्याआधी तिने सीसीटीव्ही बंद करायचा प्रयत्न केला. मात्र माझं कोण काय बिघडवणार ? असं बोलत तिने पैशांचे बंडल सीसीटीव्हीत दाखवले. मात्र या सगळ्या प्रकाराबाबत गायकवाड यांनी पोलिसांना आधीच माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. ही तरूणी पैशांची बंडलं घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीस तिथे दाखल झाले आणि तरूणीला अटक केली.
बलात्कार हा खरोखर अमानूष गंभीर प्रकार... समाजातल्या बलात्कारी प्रवृत्तींना संपवणं गरजेचं आहेच. पण बलात्काराची धमकी देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची प्रवृत्तीही तेवढीच विकृत म्हणावी लागेल.