वैभव बलकुंडे, झी 24 तास, लातूर: लातूर जिल्ह्यात प्रचलित दहा रुपयाच्या नाण्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. इथले ग्राहक व्यापाऱ्यांकडून 10 रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याचे समोर आले आहे. 10 रुपयांचे नाणे बंद झाले आहे, त्यामुळे आम्ही घेणार नाहीत असे ग्राहकांकडून व्यापाऱ्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये डोकेदुखी वाढली.हे प्रकरण इतक्या टोकाला गेले की जिल्हा प्रशासनाला यामध्ये लक्ष घालावे लागले आहे. काय आहे हे प्रकरण? या घटनेचे पडसाद कसे पडतायत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
लातूर जिल्ह्यात सध्या प्रचलित असलेल्या दहा रुपयाच्या नाणे बंद असल्याची अफवा पसरली आहे. दरम्यान यामुळं प्रचलित असलेले दहा रुपयाचे नाणे हे लातूर जिल्ह्यातील बाजारात व्यापाऱ्याकडून आणि ग्राहकाकडून बंद झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रचलित असलेले नाणे हे व्यवहारात स्वीकारले जात नसल्याने व्यापाराची आणि ग्राहकाची डोकेदुखी वाढली आहे.
10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यावरुन शहरात अनेक ठिकाणी वादही होत असल्याची प्रतिक्रिया व्यापारी देत आहेत. तर हे नाणं ग्रामीण भागातील दुकानदार घेतच नाहीत तर मग आम्ही हे नाणे कशासाठी घ्यायचं? असा प्रश्नही ग्राहक उपस्थित करत आहेत.
जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. 10 रुपयांचे प्रचलित नाणे बंद झाले ही केवळ अफवा आहे. यावर विश्वास ठेवू नका. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून असे कोणते नोटिफिकेशन काढले नाही. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे न स्वीकारणे हे कायदेने गुन्हा असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.