Nanded LokSabha : नांदेड... छत्रपती संभाजीनगरनंतर झपाट्यानं विकसित होत असलेलं मराठवाड्यातलं दुसरं मोठं शहर... शिखांचे दहावे गुरू श्री गुरू गोबिंदसिंगजी महाराज यांच्या पावन वास्तव्यानं पुनित झालेलं. सचखंड गुरुद्वारामुळं जगभरातल्या शिखांचं श्रद्धास्थान असलेलं नांदेड... देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण शक्तिपीठ रेणुकामातेचं मंदिर इथं आहे. निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्ती मिळवण्यासाठी झालेल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामात अग्रगण्य होते ते नांदेडकर... महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाणांमुळं नांदेड राजकीय नकाशावर आलं. त्यांचे पुत्र अशोक चव्हाण देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र तरीही विकासाच्या आघाडीवर नांदेडची म्हणावी तशी भरभराट झाली नाही.
नांदेडचं दुखणं
बंद पडलेल्या उद्योगांचा जिल्हा अशी नांदेडची दुर्दैवी ओळख बनलीय. एनटीसी मिल, टेक्सकॉम, शिफ्टा, फाटा केमिकल असे अनेक मोठे उद्योग बंद पडले. पंचतारांकित दर्जा असलेल्या कुष्णुर एमआयडीसीमध्ये बोटावर मोजण्याइतके छोटे उद्योग सुरू आहेत. 2008 साली झालेल्या गुरू-दा-गद्दी सोहळ्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचा निधी नांदेडला मिळाला. मात्र, योग्य नियोजनाअभावी शहराच्या विकासाची संधी हुकली. नांदेडमधून मुंबई-पुण्याला जाणारी प्रवासी संख्या जास्त असली तरी पुरेशा रेल्वेगाड्या उपलब्ध नाहीत.
नांदेडचं राजकीय गणित
शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाणांमुळं नांदेडमध्ये काँग्रेसचा दबदबा होता. मात्र गेल्या दहा वर्षांत भाजपानं आपलं स्थान मजबूत केलंय. 2009 साली शंकरराव चव्हाणांचे जावई भास्करराव खतगावकर काँग्रेसच्या तिकिटावर तिसऱ्यांदा खासदार झाले. त्यांनी भाजपच्या संभाजी पवारांचा ७४ हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेतही काँग्रेसचे अशोक चव्हाण खासदार झाले. त्यांनी भाजपच्या दिगंबर पाटलांना ८१ हजार मतांनी हरवलं. मात्र, 2019 साली नांदेडकरांनी अशोक चव्हाणांना आपटी दिली... भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांना ४० हजार मतांनी धोबीपछाड दिली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं तब्बल दीड लाखं मतं घेतल्यानं चिखलीकरांचा विजय सोपा झाला. विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर काँग्रेसचे 3, भाजपचे 2 आणि शिवसेनेचा 1 आमदार निवडून आला होता.
अशोकरावांच्या हाती घड्याळ
मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी भाजपचं कमळ हाती धरलं. त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली. भाजपनं नांदेडमधून पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी दिलीय. दुसरीकडं काँग्रेसनं माजी आमदार वसंतराव चव्हाणांच्या नावाची शिफारस उमेदवारीसाठी केलीय. तर महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीनंही नांदेडवर दावा ठोकलाय.
आतापर्यंत नांदेडमध्ले काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत झाली. त्यात कधी काँग्रेस, तर कधी भाजपचा खासदार निवडून आला. यंदा मतदार कुणाच्या पारड्यात कौल टाकणार, याची उत्सूकता आहे. अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळं भाजपची ताकद वाढलीय. तर काँग्रेसला जोर का झटका बसलाय. या धक्क्यातून काँग्रेस कशी सावरणार, हाच मोठा प्रश्न आहे.
नांदेडमध्ये पहायला गेलं तर अशोक चव्हाण इस इक्वल टू काँग्रेस असंच समीकरण आहे. भाजप सत्तेत येण्यापूर्वी संपूर्ण नांदेडमध्ये काँग्रेसचा बोलबाला होता. नांदेड जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदारसंघ... त्यातील आता 4 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. तर 3 मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. आता अशोकरावच भाजपवासी झाल्याने नांदेडमध्ये स्पर्धेला वाव राहिला नाही, असं म्हटल तर वावगं ठरणार नाही.