Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने (Mahayuti) पालघर वगळता महाराष्ट्रातील सर्व उमेदावारांची नावं जाहीर केली आहेत. यापैकी भाजपाला (BJP) वाट्याला सर्वाधिक 28 जागा आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने (Shivsena) 15 जागांवर उमेदवारी उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने (NCP) 4 तर रासपने एका जागेवर उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या पाच नेत्यांना महायुतीने यंदाच्या लोकसभेत उमेदवारी दिली आहे.
या पाच उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपने नारायण राणे (Narayan Rane) यांना लोकसभेचं तिकिट दिलं आहे. किरिट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर भ्रष्टाचार आणि बेहिशोबी संपत्तीचे आरोप केले होते. यानंतर ईडीने काही शेल कंपन्यांची चौकशी केली होती. नीलम हॉटेल आणि ग्रुप ऑफ कंपनीमध्ये शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार झाले, शेल कंपन्या काढून कमी रुपयांचे समभाग दाखवून ते अधिक किंमतीला विकून मोठा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप किरिटी सोमय्यांनी केला होता. यानंतर राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना नुकतीच क्लीन चिट देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला. सुनेत्रा पवार यांच्यावर आरोप झालेला जरंडेश्वर साखर कारखान्यावरील आरोप कसे चुकीचे आहेत याबद्दल क्लोजर रिपोर्टमध्ये सविस्तर सांगण्यात आलंय. जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहारात घोटाळे झाल्याचा आरोप किरिट सोमय्यांनी आरोप केला होता. या कारखान्याशी सुनेत्र पवार संलग्न होत्या.
रायगड मतदार संघातून उमेदवारी देण्यात आलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर किरिट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तटकरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बोगस कंपन्या स्थापन केल्या, त्यानंतर या बोगस कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागात शेतजमिनी खरेदी केल्या. शेतकऱ्याकडून कवडी मोलाने खरेदी केलेल्या या जमिनी नंतर चढ्या दराने दुसऱ्या कंपन्यांना विकल्या, जमिनी खरेदी विक्रीच्या या व्यवहारामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांनी सहकार्य केले, असा आरोप किरीट सोमय्यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला होता.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांची लढत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याबरोबर होणार आहे. रविंद्र वायकर यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला होता. रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या दोन लाख वर्ग फूट जमिनीवर अनधिकृत कब्जा केला असून तिथे 500 कोटींचं पंचतारांकित हॉटेल उभारलं जात असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटातर्फे यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामिनी जाधव (Yamini Jadhav) उद्धव ठाकरे गटात असताना आयकर विभागने त्यांच्या आणि पती यशवंत जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. जवळपास चार दिवस आयकर विभागाने जाधव यांच्या घरी ठिय्या मांडला होता. मुंबईतील कोव्हिड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप किरिट सोमय्यांनी त्यांच्यावर केला होता. तसंच यामध्ये मनी लाँड्रिंग केल्याचाही आरोपही करण्यात आला होता.