Maharashtra Weather News : हाडं गोठवणारी थंडी वीकेंड गाजवणार; राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी?

Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट अन् आठवडी सुट्टी... हाडं गोठवणाऱ्या थंडीत;. पाहा हवामान विभागानं दिलेली सविस्तर माहिती.     

सायली पाटील | Updated: Nov 29, 2024, 08:42 AM IST
Maharashtra Weather News : हाडं गोठवणारी थंडी वीकेंड गाजवणार; राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी?  title=
Maharashtra Weather News Cold wave hits the state latest update Mumbai Dhule niphad temprature

Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून भारतासह महाराष्ट्रात थंडीचा कडाका प्रचंड प्रमाणात वाढला असून, देशातील प्रत्येक हवामान बदलांचा कमीजास्त प्रमाणात महाराष्ट्रावरही परिणाम होताना दिसत आहे. एकिकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबातचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचं रुपांत चक्रीवादळात होण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली असतानाच देशाच्या उत्तरेकडील राज्यांसह मध्य आणि दक्षिणोत्तर भारतामध्ये मात्र थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील थंडीचा कडाका वाढण्यामागं बंगालच्या उपसागरावरील वादळी प्रणाली आणि त्यामुळं वाऱ्यांची महाराष्ट्रानं येण्याची दिशा हे कारण ठरत आहे. तर, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींची यामध्ये भर पडत असून, त्यामुळं वातावरणात कोरडेपणाही जाणवू लागला आहे. राज्याच्या उत्तर आणि मध्य क्षेत्रात पुढील 48 तासांपर्यंत ही प्रणाली कायम राहणार असल्यामुळं अद्यापही थंडीचा यलो अलर्ट जारी ठेवण्यात आला आहे. 

गुरुवारी राज्यातील निफाड क्षेत्रामध्ये सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. इथं पारा 6 अंशांवर पोहोचला असून, धुळ्यात तापमान 8 अंशांवर असल्याचं पाहायला मिळालं. थंड हवेचं ठिकाण म्हणून लोकप्रिय असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षा या भागांमध्ये तापमानात अधिक घट दिसून आली. फक्त मध्य महाराष्ट्रच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातही थंडीची लाट कायम राहणार असून, इथंसुद्धा हिवाळ्याच्या धर्तीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. चक्रीवादळाच्या प्रभावामुळं हे बदल दिसून येतील. 

राज्यात थंडीची लाट ओसरणार 

नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारपासून राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम असून, नाशिक, नगर, पुण्यात गुरुवारीही पारा 9 अंशांवर होता ही बाब लक्षात घेण्याजोगी.