LokSabha Election: ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. भुजबळांनी घाबरुन माघार घेतली असं ते म्हणत आहेत. मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही असंही ते नाशिकमधील पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. नाशिकमध्ये उमेदवार जाहीर करण्यासाठी वेळ लागत असल्याने आपण माघार घेतली असाही दावा त्यांनी केला.
"प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल तर अतिशय अयोग्य आहे. प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते आहेत. मला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे त्या संविधानाने मताचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. लोकांना कोणाला मत द्यायचं याचा अधिकार असून, भीती दाखवण्याची गरज नाही. समोरच्या कोणी उमेदवारांनी केलं असेल असे मला वाटत नाही. काही अति उत्साही कार्यकर्ते असतात आणि मग ते असं काहीतरी करतात. माझ्याबद्दल ते म्हणाले भुजबळ यांनी घाबरून माघार घेतली. मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही," असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, "मी माघार घेतली कारण उमदेवार जाहीर होण्यासाठी वेळ लागणं योग्य नाही असं वाटलं. माझ्यामुळे पक्षांची, इच्छुकांची अडचण होत असेल तर बाजूला व्हावं असं ठरवलं. ज्याला उमेदवारी जाहीर केली जाईल त्याला पूर्ण पाठिंबा असेल".
"ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही. आता कशाला घाबरायचं? माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही. पण माझ्यामुळे महायुतीची अडचण होत असेल तर मी बाजूला व्हावं असं ठरवलं, पण लवकर निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे अशी भूमिका होती. प्रकाश शेंडगे किंवा कोणत्याही पक्ष, समाजाचा उमेदवार असेल तर लोक ठरवतील. आपण दादागिरीने कोणाला थांबवू शकत नाही. प्रकाश शेंडगे यांच्वार हल्ला झाला असेल तर पोलिसंनी त्यांचं सऱक्षण करायला हवं," असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
मी उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट वैगैरे असा शब्द वापरला नाही. प्रश्न सहनुभूतीचा नसून देशाचं नेतृत्व कोण करू शकतो हा प्रश्न मतदार विचारात घेतात. नरेंद्र मोदींसारख्या खंबीर नेत्याच्या बाजूने लोक उभे राहतील. बाकी मतदानाच्या वेळेला लोक सहानुभूती बाजूला ठेवतात," असं भुजबळांनी सांगितलं.
"मी सांगितलं होतं 20 मे पर्यंत तरी उमेदवार जाहीर करा. मला वाटलं माझ्यामुळे अडला असेल म्हणून मी दूर झालो. आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्याच्या दोन्ही जागा निवडून आणू. महायुतीत अनेक नेत्यांकडे मत मांडणार देवाण-घेवाण करणार," असंही त्यांनी सांगितलं.