Direct Fight Between Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Candidates: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सहा प्रमुख पक्षांपैकी पाच पक्षांनी आपल्या उमेदवारांची किमान एक यादी तरी जाहीर केली आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या दोन्ही बाजूने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमधील लढती स्पष्ट झाल्या आहेत.
आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारी अर्जांनुसार राज्यातील 288 जागांपैकी किमान 26 जागांवर थेट उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहेत. हे मतदारसंघ कोणते आणि त्यामधून कोणाविरुद्ध कोण लढणार आहेत पाहूयात...
1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिल्याने येथे दोन्ही शिवसेनेमध्ये थेट लढत होणार आहे.
2) माहीम मतदारसंघातून शिंदेंनी सदा सरवणकरांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात ठाकरेंनी महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.
3) कुर्ला मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी प्रविणा मोरजकरांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर निवडणूक लढवत आहेत.
4) महाडमधून शिंदेंनी बंडात त्यांना साथ देणाऱ्या आमदारांपैकी एक असलेल्या भरत गोगावलेंना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात त्यांची थेट लढत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्याशी असणार आहे.
5) मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाला लागून असलेल्या ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघात एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय आमदार प्रताप सरनाईक ठाकरेंच्या शिवसेनेच्या नरेश मणेरांविरोधात लढणार आहेत.
6) मागाठणे मतदार संघात ठाकरेंच्या पक्षाचे अनंत (बाळा) नर हे शिंदेंच्या शिवसेनेच्या मनिषा वायकर यांच्याविरुद्ध लढणार आहेत.
7) कर्जत मतदारसंघामध्ये ठाकरेंचे नितीन सावंत विरुद्ध शिंदेंचे उमेदवार महेंद्र थोरवे असा थेट सामना रंगणार आहे.
8) राधानगरी मतदारसंघातून ठाकरेंनी के. पी. पाटील यांना उमेदवारी दिली असून शिंदेंच्या पक्षाकडून या ठिकाणी प्रकाश आबिटकर निवडणुकीसाठी उभे आहेत.
9) राजापूर मतदारसंघातून ठाकरेंनी राजन साळवींना उमेदवारी दिली आहे. तर शिंदेंनी या ठिकाणी किरण सामंतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
10) सिल्लोडमधून शिंदेंचे सहकारी तसेच मंत्री अब्दुल सत्तार निवडणूक लढवत असून त्यांना ठाकरेंचे उमेदवार सुरेश बनकर आव्हान देणार आहेत.
11) रामटेक मतदारसंघमध्ये ठाकरेंचे विशाल बरबटे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल असा थेट सामना रंगणार आहे.
12) वैजापूरमधून ठाकरेंचे दिनेश परदेशी हे एकनाथ शिंदेंच्या पक्षातील रणेश बोरणारे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
13) सावंतवाडीमधून ठाकरेंचे राजन तेली विरुद्ध शिंदेंचे विश्वासू दीपक केसरकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.
14) सांगोल्यात ठाकरेंच्या पक्षाचे दीपक आबा साळुंखे हे शिंदेंचे विश्वासू सहकारी शहाजी बापू पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
15) नांदगावमधून ठाकरेंचे उमेदवार गणेश धात्रक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या सुहास कांदे यांना आव्हान देत आहेत.
16) मेहकरमधून ठाकरेंच्या पक्षातील सिद्धार्थ खरात हे शिंदेंच्या संजय पायमुलकर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
17) रत्नागिरीमध्ये ठाकरेंचे सुरेंद्रनाथ (बाळ) माने विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत अशी लढत पाहायला मिळणार आहे.
18) पाचोऱ्यात ठाकरेंच्या वैशाली सूर्यवंशी या एकनाथ शिंदेंच्या किशोर धनसिंग पाटील यांना टक्कर देत आहेत.
19) संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार राजू शिंदे असून त्यांच्याविरुद्ध शिंदेंनी संजय शिरसाठ यांना उमेदवारी दिली आहे.
20) पाटणमधून ठाकरेंचे उमेदवार हर्षद कदम असून ते विद्यमान मंत्री तसेच शिंदेंचे निकटवर्तीय शंभूराज देसाई यांना आव्हान देणार आहेत.
21) दापोली मतदारसंघात कदम विरुद्ध कदम अशी लढत पाहायला मिळणार आहे. ठाकरेंनी संजय कदमांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात शिंदेंचे योगेश कदम लढणार आहेत.
22) कळमनुरी मतदारसंघात ठाकरेंचे डॉ. संतोष टाळफे विरुद्ध शिंदेंच्या पक्षातील फायर ब्रॅण्ड आमदार संतोष बांगर असा सामना होणार आहे.
23) संभाजीनगर मध्य मतदारसंघात ठाकरेंनी किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रदीप जयस्वाल निवडणूक लढवत असून ते शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत.
24) परांड्यातून शिंदेंचे सहकारी आणि विद्यमान आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे ठाकरेंच्या राहुल ज्ञानेश्वर पाटलांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
25) मलेगाव बाह्य मतदारसंघामध्ये ठाकरेंचे उमेदवार अद्वय हिरे हे थेट शिंदेंचे आमदार आणि मंत्री दादा भुसेंना आव्हान देणार आहेत.
26) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक हे कुडाळमधून लढत असून नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे निलेश राणे त्यांच्याविरुद्ध उभे आहेत.